अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन घरफोड्यांचा छडा!
मध्य प्रदेशातील दोन संशयित चोरटे जेरबंद; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चोरीचा मुद्देमाल हस्तगत

अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन घरफोड्यांचा छडा!
मध्य प्रदेशातील दोन संशयित चोरटे जेरबंद; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चोरीचा मुद्देमाल हस्तगत
अमळनेर, प्रतिनिधी : शहरातील बंद घरांचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या दोन संशयितांना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अमळनेर शहरातील तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, संशयितांकडून चांदीची गणेशमूर्ती, लक्ष्मीचे चांदीचे नाणे आणि सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
नवलसिंह बनसिंह अलावा (वय ३९, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार) आणि केरु उर्फ केहरु इडिया डाबर (वय ४५, रा. बलेडी गलबेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
गुप्त माहितीवरून पहिला संशयित ताब्यात
अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना नवलसिंह अलावा याच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदार केरु उर्फ केहरु डाबर याच्यासोबत अमळनेर शहरात वेगवेगळ्या वेळी घरफोड्या केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मध्यरात्री बंद घरांमध्ये शिरून चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री दोघे मोटारसायकलने अमळनेर शहराबाहेरील शेतांपर्यंत आले. तेथे वाहन उभे करून मध्यरात्रीनंतर नदीजवळील वसाहतीत प्रवेश केला. बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे तपासात समोर आले.
यानंतर ३ एप्रिल २०२६ रोजी सिमेंट काँक्रिट रोड परिसरातील वसाहतीत बंद घराचे कुलूप तोडून दागिने चोरी केल्याची माहितीही पुढे आली. २४ ऑगस्ट २०२६ रोजी याच परिसरातील दुसऱ्या बंद घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील १० हजार रुपये रोख, चांदीची गणेशमूर्ती आणि लक्ष्मीचे नक्षीकाम केलेले गोल चांदीचे नाणे चोरल्याची माहिती संशयिताने चौकशीत दिल्याचे पोलिसांनी नमूद केले.
मध्य प्रदेशातून साथीदाराला अटक
पहिल्या संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमळनेर पोलिसांचे पथक मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट तालुक्यातील बलेडी गावात पोहोचले. तेथून केरु उर्फ केहरु डाबर याला ताब्यात घेऊन अमळनेर येथे आणण्यात आले. त्यालाही संबंधित घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली.
सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पोलिसांनी तीन गुन्ह्यांशी संबंधित चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये ९० ग्रॅम वजनाची चांदीची गणेशमूर्ती, २० ग्रॅम वजनाचे लक्ष्मीचे चांदीचे नाणे, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची गोळी, ५० ग्रॅम चांदीचा तुकडा, १४ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे, पाच ग्रॅम व एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, २३ ग्रॅम वजनाचे दोन चांदीचे करदोडे, २५ ग्रॅम वजनाचे दोन जोड चांदीचे वाळे आणि १८ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे यांचा समावेश आहे.
हा मुद्देमाल अमळनेर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४४६/२०२६, ३२/२०२६ आणि १५९/२०२६ या प्रकरणांशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस नाईक सूर्यकांत साळुंखे, पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.






