जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरसोलीतील घटना; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
जळगाव, प्रतिनिधी : शिरसोली गावातील जुन्या भांडणाचा राग मनात धरून दापोरा येथील एका तरुणासह त्याच्या मित्रांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिरसोली प्र.न. येथील स्मशानभूमीजवळ घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी विशाल विनोद पाटील (वय २१, रा. दापोरा, ता. जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी (सर्व रा. शिरसोली, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील हा सुप्रीम कंपनीत मजुरीचे काम करतो. दि. २६ जून रोजी रात्री तो त्याचे मित्र रोशन मधुकर लांबोडे आणि ललित ज्ञानेश्वर भोई यांच्यासोबत रोशनच्या पल्सर मोटारसायकलने (क्र. एमएच-१९ ईएम-९२९५) शिरसोलीहून दापोरा येथे जात होता.
रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिरसोली स्मशानभूमीजवळ पोहोचताच संशयितांनी त्यांना रस्त्यात अडवले. दि. २५ जून रोजी गावात दर्शन देवरे, रवी मिस्तरी, मयुर भोई आणि प्रेम सोडव यांच्यात झालेल्या भांडणात तुम्हीही सहभागी होता, असा आरोप करत संशयितांनी विशाल आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर तिघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, संशयित दीपक भिल याने जवळील चॉपरने विशाल पाटील याच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि कोपरावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच तिघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
हल्ल्यानंतर विशाल आणि त्याच्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढत गावातील शुभम सोनवणे याला फोन करून बोलावून घेतले. शुभमने जखमी विशालला तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.






