
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । मुंबईहून अमृतसरकडे जाणाऱ्या ११०५७ अमृतसर एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीच्या ब्रेक डिस्कला आग लागल्याची घटना बुधवार दि.१ जुलै रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग तात्काळ आटोक्यात आली असून संभाव्य मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून अमृतसरकडे धावणारी अमृतसर एक्सप्रेस सकाळी सुमारे ७ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी रेल्वे रुळाला लागलेली एक चावी (की) उडून डीव्हीला लागल्याने एअर प्रेशर अचानक रिलीज झाले. परिणामी सामान ब्रेक व जनरेटर कार बोगीचे ब्रेक अचानक दाबले गेले. या प्रक्रियेमुळे ब्रेक डिस्कमध्ये तीव्र घर्षण निर्माण होऊन आग लागली.
आगीनंतर बोगीच्या परिसरातून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागल्याने स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्येही घबराट पसरली. मात्र रेल्वे स्थानकावरील तसेच रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जनरेटर बोगीतील दोन फायर एक्स्टिंग्विशरच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, भुसावळ येथील ड्युटी आटोपून इगतपुरी मेमूने घरी जात असलेले तांत्रिक सहाय्यक देवेंद्र गुरव जळगाव स्थानकावर उतरले असता त्यांनी हा प्रकार पाहिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत त्यांनी एअर प्रेशर नियंत्रित केले आणि रेल्वेची यंत्रणा पुन्हा सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर आवश्यक तांत्रिक तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी सुमारे ८.१५ वाजता अमृतसर एक्सप्रेस भुसावळच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा प्रवाशांना दुखापत झाली नसली, तरी रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






