Crime

आर्थिक तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वराड येथील घटना

आर्थिक तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वराड येथील घटना

चोपडा | प्रतिनिधी

तालुक्यातील वराड येथील शेतकरी योगेश बबनराव भोसले (वय ४९) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत शेतकऱ्याचा मुलगा प्रतीक योगेश भोसले (वय २१) यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात फायनान्स व खासगी आर्थिक व्यवहारांशी संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश भोसले यांनी काही वर्षांपूर्वी शेतीच्या कामासाठी कोटक महिंद्रा बँकेच्या माध्यमातून फायनान्सवर ट्रॅक्टर खरेदी केला होता. ट्रॅक्टरच्या हप्त्यांचा भरणा उशिरा झाल्याने संबंधित फायनान्सशी संबंधित व्यक्तींकडून वारंवार फोन करून पैशांची मागणी, शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, १३ जुलै रोजी निवृत्ती कोळी यांनी थकीत हप्त्याचे कारण देत ट्रॅक्टर ताब्यात घेतला. या घटनेनंतर आर्थिक व्यवहारांबाबतचा तणाव वाढला होता. या सर्व प्रकारामुळे योगेश भोसले मानसिक तणावाखाली असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.

घरातून चिठ्ठी जप्त

घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांनी घरातून एक डायरी व रजिस्टर जप्त केले. त्यामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिल्याचा संशय असलेली एक चिठ्ठी आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चिठ्ठीत काही व्यक्तींकडून होत असलेल्या कथित त्रासाचा उल्लेख असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, या चिठ्ठीतील मजकूराची सत्यता आणि त्याचे पुरावेमूल्य तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिघांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी करण कोळी, नामदेव भोई आणि निवृत्ती कोळी यांच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button