Crime

यात्रेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांवर डल्ला; वर्ध्याच्या टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी केला पर्दाफाश

तीन पुरुष, दोन महिला अटकेत; विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात ,, ८ लाख १६ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त

यात्रेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांवर डल्ला; वर्ध्याच्या टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी केला पर्दाफाश

तीन पुरुष, दोन महिला अटकेत; विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात ,, ८ लाख १६ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव | प्रतिनिधी

यात्रेतील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. लांबे येथील शेंद्रे बाबा यांच्या यात्रेत मंगळसूत्र चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संशयित पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायरचा माग काढत पोलिसांनी पाठलाग केला. रहिपुरी गावाबाहेर भरधाव वाहन अर्धवट सिमेंटच्या पोलमध्ये अडकल्यानंतर पोलिसांनी तीन संशयितांना वाहनासह ताब्यात घेतले. त्यानंतर तपासाची कडी जोडत दोन महिला आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकापर्यंत पोलीस पोहोचले.

या कारवाईत तीन पुरुष आणि दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून २४.२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्या व मणी, तीन मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची मारुती डिझायर कार असा एकूण ८ लाख १६ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लांबे गावचे ग्रामदैवत असलेल्या शेंद्रे बाबा यांच्या यात्रेत गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) दुपारी सुमारे ४ वाजता एक महिला यात्रेत फिरत असताना तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी महिलेने शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २६३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यात्रेतील गर्दीचा फायदा घेत चोरी झाल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथक तयार करून गोपनीय माहिती संकलनाला सुरुवात करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांना संशयित आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून पसार झाल्याची माहिती मिळाली. वाहनाचा क्रमांक एमएच-१६ असा असल्याचे समजले; मात्र पुढील क्रमांक उपलब्ध नव्हता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जामधा फाटा येथे नाकाबंदी केली.

दरम्यान, चाळीसगावकडून जामधा फाट्याच्या दिशेने येणारी संशयित कार पोलिसांना दिसली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला; मात्र चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने जामधाच्या दिशेने पळवून नेले. त्यानंतर पोलिसांनी शासकीय वाहनासह खासगी मोटारसायकलींच्या मदतीने कारचा थरारक पाठलाग सुरू केला.

पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर संशयितांनी वाहन आणखी वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रहिपुरी गावाबाहेर बोरखेड्याकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या अर्धवट सिमेंटच्या पोलमध्ये अडकली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कारमधील तीन पुरुषांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान त्यांनी महिला साथीदारांच्या मदतीने यात्रेत मंगळसूत्र चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रहिपुरी परिसरात महिला साथीदारांचा शोध सुरू केला. या कारवाईत मोनिका तुकाराम चव्हाण (वय २३, रा. सुंदरनगर, वर्धा) आणि सुभाना राकेश भोसले (वय १९, रा. आर्वी, अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकासही ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात सतिष तुकाराम चव्हाण, ओम तुकाराम चव्हाण आणि कुणाल सरनेरसिंग चव्हाण या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दागिन्यांसह तीन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली डिझायर कार जप्त केली आहे.

जप्त मुद्देमालामध्ये २४.२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मंगळसूत्रातील १७ सोन्याच्या वाट्या आणि २४ सोन्याचे मणी यांचा समावेश असून, या सोन्याची किंमत ३ लाख ८० हजार ८८२ रुपये आहे. तीन मोबाईल फोनची किंमत ३६ हजार रुपये, तर पांढऱ्या रंगाच्या मारुती डिझायर कारची किंमत चार लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ८ लाख १६ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

चौकशीदरम्यान आरोपींनी यापूर्वी चाळीसगाव, नांदगाव बसस्थानक तसेच नाशिक शहरातील सीबीएस बसस्थानक परिसरातही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे मणी चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे या टोळीने आणखी किती ठिकाणी अशाच प्रकारे हात साफ केला आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

यात्रा, बाजारपेठा आणि बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने अशा गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. आरोपींच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सह्याद्री बिर्ले यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ किशोर पाटील, शांताराम पवार, देविदास पाटील, मनोज पाटील, प्रकाश कोळी, प्रवीण पाटील, राजेंद्र जाधव, मुकेश देशमुख, पोकॉ विनोद बेलदार आणि कमलेश महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button