सात वर्षांनंतर अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी अभय कुरुंदकर दोषी; शिक्षेची सुनावणी ११ एप्रिलला

सात वर्षांनंतर अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी अभय कुरुंदकर दोषी; शिक्षेची सुनावणी ११ एप्रिलला
पनवेल | प्रतिनिधी
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात तब्बल सात वर्षांनंतर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल येथील सत्र न्यायालयाने बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला खूनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. तर या प्रकरणातील शिक्षेची सुनावणी येत्या ११ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
या प्रकरणातील आरोपी राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे, आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे.
११ एप्रिल २०१६ रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे या अचानक बेपत्ता झाल्या होत्या. बेपत्ते होण्याआधी त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांची भेट घेतली होती. याच भेटीत कुरुंदकरने स्वतःच्या कारमध्ये गळा दाबून त्यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली.
त्यावेळी महेश फळणीकर हा घटनास्थळी उपस्थित होता. खून केल्यानंतर कुरुंदकरने लाकूड कापायच्या कटरने मृतदेहाचे तुकडे केले आणि फळणीकर, खासगी चालक आणि राजू पाटील यांच्या मदतीने ते तुकडे वसईच्या खाडीत फेकले.
अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्यानंतर त्या जिवंत असल्याचे भासवण्यासाठी कुरुंदकरने त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मेहुण्याला खोटा व्हॉट्सअप मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये त्यांनी मानसिक अस्वस्थतेमुळे उत्तर भारतात उपचार घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते.
मात्र, या मेसेजमधील “हाऊ आर यू” या वाक्यात ‘यू’ऐवजी ‘वाय’ या अक्षराचा वापर करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी याची सखोल छाननी केली असता, अश्विनी बिद्रे या नेहमी ‘यू’ लिहायच्या, ‘वाय’ कधीच वापरत नसत, हे स्पष्ट झाले. याच चुकलेल्या अक्षरामुळे कुरुंदकरचा पर्दाफाश झाला आणि त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे सापडले.
या प्रकरणातील न्यायालयीन लढाईला सात वर्षांचा कालावधी लागला. अखेर न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला दोषी ठरवत, न्यायाच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलले आहे.
११ एप्रिल २०२५ रोजी त्याच्यावरील शिक्षेची अंतिम सुनावणी होणार असून, या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.