
धरणगाव रोडवर रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन; अमळनेर तालुक्यात बिबट्याची भ्रमंती सुरूच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अमळनेर: अमळनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वनविभागाला चकवा देत बिबट्याची मुक्त भ्रमंती सुरूच आहे. यातच धरणगाव रोडवर पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी बिबट्या प्रत्यक्ष दिसून आल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण बडगुजर, मनिष देसले, निखिल चौधरी आणि सनी गायकवाड हे तरुण रात्रीच्या वेळी धरणगाव रोडने सती मातेच्या दर्शनासाठी जात होते. दरम्यान, रस्त्यावरील बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामाजवळ त्यांना अचानक एक बिबट्या धावताना दिसला. या तरुणांनी सतर्कता दाखवत बिबट्याचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले.
> वनविभागाच्या अपयशावर प्रश्नचिन्ह
> गेल्या काही दिवसांपासून अमळनेर तालुका परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत असले, तरी बिबट्या वनविभागाच्या पथकाला सतत चकवा देत आहे. बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप अपयश आल्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावरच बिबट्याचा वावर वाढल्याने धरणगाव रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी अत्यंत काळजीपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन केले जात आहे. तसेच वनविभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.







