धीरजभाऊ परदेशी हत्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा द्या

धीरजभाऊ परदेशी हत्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा द्या
करणी सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी
जळगाव : स्व. धीरजभाऊ परदेशी यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निष्पक्ष व जलद तपासाची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, धीरजभाऊ परदेशी यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना असून, या घटनेमुळे समाजात तीव्र दुःख, संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि जलदगतीने करून आरोपींवर कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा
या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी विशेष मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा मिळण्यासाठी सक्षम कायदेशीर प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली.
कुटुंबाला आर्थिक व कायदेशीर मदतीची मागणी
पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य ती आर्थिक व कायदेशीर मदत देण्यात यावी. तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी करणी सेनेचे कार्याध्यक्ष भगवान खंडाळकर, दामोदर राजपूत, जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंह मोरे, संदीप राणा, सारिका ताई पाटील, किरण राजपूत, कविता ताई पाटील, जयश्री ताई पाटील, आशिष राजपूत, अजय राजपूत, विकास राजपूत, अभिजित राजपूत, दिलीप पाटील आदी समाजबांधव उपस्थित होते.







