ब्रेकिंग : मविप्रचे कागदपत्रे चोरी, ३ वर्षांनी ॲड.प्रवीण चव्हाण, विजय पाटलांसह चौघांवर गुन्हा
महा पोलीस न्यूज । दि.१४ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयातील संस्थेच्या कार्यालयात गुन्हा करण्याच्या उद्देशाने कागदपत्रे चोरणे आणि मारहाण धमकी केल्याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश भोईटे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात ॲड.प्रवीण चव्हाण, विजय पाटलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, विजय भास्कर पाटील व त्यांचे सहकारी यांनी जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगावमध्ये दिनांक १९/०७/२०२१ रोजी नूतन मराठा महाविद्यालय जळगाव मधील संस्थेच्या कार्यालयात गुन्हा करण्याच्या हेतूने दांडगाईने प्रवेश करून मुळ शिक्षक हजेरी बुक एकुण २, आवक जावक रजिस्टर, मानद सचिव यांच्या नावाने असलेले संस्थेचे लेटर हेड बुक, ऑडीट संदभांतील कागदपत्रे, तसेच ईतर महत्वाची अनेक कागदपत्रे चोरली. प्राचार्य व इतर काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि धमक्या दिल्या.
तसेच त्यानंतर त्याच कागदपत्रांचे बनावटीकरण (फोर्जरी) करून त्यातील काही कागदपत्रे संगनमताने क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व इतर काही शासकीय कार्यालयात वापरली. व याच घटनाक्रमाचा भाग म्हणून लबाडीने व सूडबुद्धीने त्यांनी खोटे व बनावट पुरावे देखील तयार केले व ते खरे म्हणून ठिकठिकाणी वापरले म्हणुन भारतीय दंड विधानच्या कलम ४५२, ३७९,३२३, ५०४, ५०६, १९३, ४६५, ४६८, ४७१, सह ३४ तसेच १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात
निलेश रणजीत भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ॲड.प्रवीण चव्हाण, विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, विनोद प्रभाकर पाटील आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विजय पाटील यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.