हनी ट्रॅप प्रकरण : मनोज वाणी यांची निर्दोष मुक्तता!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव l जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. ४३५/२०२० भा. द. वि. कलम २९४, ४१७, १२० (ब), ३४ नुसार दाखल असलेल्या हनीट्रॅपप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी मनोज लीलाधर वाणी यांची जळगाव येथील पाचवे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मिलिंद एम. निकम यांच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक शांताराम पाटील यांनी दि.१६ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिलेने अभिषेक यांना फोन करून भेटण्याचे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती फिर्यादीच्या कार्यालयात येऊन, “तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे काम मला देण्यात आले आहे. परंतु मला तुमचे नुकसान करायचे नाही. काही विरोधक तुम्हाला राजकारण आणि समाजातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे सांगितले होते. या घटनेनंतर फिर्यादीने पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
याप्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन दि.८ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी खटला निकाली काढला. त्यात आरोपी मनोज लीलाधर वाणी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे ऍड.वडवी यांनी तर संशयीत आरोपी मनोज वाणी यांच्यातर्फे ऍड. कुणाल पवार यांनी कामकाज पाहिले.






