भुसावळ हादरले! ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याची डोक्यात पट्टी मारून हत्या
संशयित आरोपी जेरबंद, अगोदर देखील २ गुन्हे दाखल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । भुसावळ शहरातील कवाडे नगर परिसरात शनिवारी सायंकाळी सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास धक्कादायक हत्येची घटना घडली. फिल्टर हाऊसमध्ये ड्युटीवर असलेल्या प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) यांच्यावर कोणतेही स्पष्ट कारण नसताना आरोपीने डोक्यात पट्टी मारून गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर, भुसावळ) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयीत आरोपी आकाश गोरखा हा मनोरुग्ण असून त्याच्यावर ठाणे येथे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत वैद्यकीय नोंदी आणि उपचारांचा तपशील पोलीस तपासत आहेत.
फिल्टर हाऊसमध्ये ड्युटीवर असलेल्या प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) यांच्यावर कोणतेही स्पष्ट कारण नसताना आरोपीने डोक्यात पट्टी मारून गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आरोपीने अचानक हा जीवघेणा हल्ला का केला, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी आकाश गोरखा याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. मात्र, सन २०२१ पासून आजपर्यंत त्याच्याविरुद्ध कोणताही नवीन गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. या घटनेमुळे कवाडे नगर परिसरात खळबळ उडाली असून, शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे प्रसाद कुलकर्णी यांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, भुसावळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे.






