बलात्कार व खुनाच्या प्रयत्नातील कुख्यात गुन्हेगार अखेर जेरबंद

बलात्कार व खुनाच्या प्रयत्नातील कुख्यात गुन्हेगार अखेर जेरबंद
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेला मोठे यश आले असून दोन गंभीर गुन्ह्यांमधील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेला बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गतचा गुन्हा, तसेच तालुका पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा या दोन्ही प्रकरणांत संशयित असलेला हसणेन शेख कुब्बद्दीन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपासासाठी त्याला बाजारपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, पोलीस कर्मचारी राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रशांत सोनार व अशोक बाविस्कर यांच्या पथकाने अत्यंत कामगिरी बजावली.
दरम्यान, या गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या इतर सह-आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढून उर्वरित आरोपींनाही लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.







