दुर्दैवी : लग्नानंतरचा पहिलाच प्रवास ठरला अखेरचा.. नववधूसह तिघे ठार

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजता झालेल्या भीषण रस्ते अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वापी येथून अकोल्याकडे जाणारी क्रूझर गाडी क्रमांक MH.30.AZ.4710 वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे चाक निखळले. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन उलटून भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत अकोला येथील पूजा रवी वागडकर (२२) या नववधूचा जागीच मृत्यू झाला. तिचा विवाह काही दिवसांपूर्वीच वापी येथे पार पडला होता आणि ती प्रथमच माहेरी परतत होती. याशिवाय दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (५२) यांचाही मृत्यू झाला.
या अपघातात प्रेम भारत वाकडकर (२४), नितेश सुरेश काठोडे (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोडकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) आणि अंश नितेश काठोडे (१४) हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






