असोदा रस्त्यावर कारची दुचाकीला धडक, तरुण ठार, एक जखमी

महा पोलीस न्यूज । दि.३ जुलै २०२५ । जळगाव तालुक्यातील असोदा येथील रहिवासी असलेले दोन तरुण गुरुवारी दुचाकीने जळगाव शहराकडे येत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी झाला असता उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार दुसरा तरुण जखमी झाला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, असोदा येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद इब्राहिम खाटीक वय-३८ या तरुणाचे जळगाव शहरात कपड्याचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो मित्र जावेद जाकिर पटेल वय-२९ असोदा याच्यासह दुचाकीने जळगावला येत होता. धनाजी पेट्रोल पंपाजवळ खारी डोहजवळ एका भरधाव कार चालकाने त्यांना धडक दिली.
अपघातात चारचाकीचे चाक छातीवरून गेल्याने मोहम्मद इब्राहिम खाटीक हा गंभीर जखमी झाला. त्याला लागलीच उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. इब्राहिमच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.