हरिणांची अवैध शिकार : इनोव्हा कारमधून पाच मृत हरणे जप्त; पाच शिकार्यांचा पळ

हरिणांची अवैध शिकार : चाळीसगाव ते धुळे दरम्यान पाठलाग करून कारमधून पाच मृत हरणे जप्त; पाच शिकारी फरार
चाळीसगाव वनविभागाची मोठी कारवाई
चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव वन विभागाने बुधवारी पहाटे मोठी कारवाई करत शिकार केलेल्या पाच मृत हरणांसह एक इनोव्हा कार जप्त केली. ही कारवाई चाळीसगाव-धुळे बायपास मार्गावर सापळा रचून करण्यात आली. कारमधील पाच संशयित आरोपी कार सोडून फरार झाले असून, वन विभाग त्यांचा शोध घेत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना जंगलातील हरणांची अवैध शिकार होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बिलाखेड गावाजवळ पहाटे सापळा रचला. यावेळी एमएच ४१ सी ९६९१ क्रमांकाची इनोव्हा कार संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जाताना आढळली.
वन कर्मचाऱ्यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वेग न कमी करता धुळेच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर चाळीसगाव ते धुळे असा थरारक पाठलाग करण्यात आला. अखेर धुळे शहरात कार थांबवण्यात यश आले; मात्र त्या आधीच कारमधील पाच जण फरार झाले.
कारची तपासणी केली असता, तिच्यात दोन नर व तीन मादी अशा पाच मृत हरणांचे अवशेष आढळून आले. ही प्रकरण वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दिली.
ही कारवाई उपवनसंरक्षक प्रवीण ए., सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिरासदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, वनपाल चंद्रशेखर पाटील, ललित पाटील, अजय महिरे, काळू पवार, रवींद्र पवार, भटू अहिरे, संजय गायकवाड, समाधान मराठे यांच्या पथकाने केली.