Crime

घाटंजीत सराईत गुन्हेगाराला दोन तलवारींसह अटक

घाटंजीत सराईत गुन्हेगाराला दोन तलवारींसह अटक

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; स्विफ्ट डिझायर कारसह ४.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

घाटंजी | प्रतिनिधी

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घाटंजी शहरात धडक कारवाई करत बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले. या कारवाईत दोन धारदार तलवारी आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंद्यांवर कारवाई तसेच फरार आरोपींच्या शोधासाठी गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार घाटंजी येथील खापरी नाका परिसरात एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये एक संशयित घातक शस्त्रांसह थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.

खापरी नाक्याजवळ संशयित स्विफ्ट डिझायर कार अडवून पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान कारच्या डिकीत निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये दोन धारदार लोखंडी तलवारी लपवून ठेवलेल्या आढळून आल्या. त्यानंतर वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

या प्रकरणात अनिल जाधव (वय २१, रा. इंदिरानगर, बेघर घाटी, घाटंजी) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये दोन धारदार तलवारी आणि अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोलीस शिपाई श्रीकांत मडावी तसेच चालक पोलीस हवालदार नरेश राऊत यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button