देवगिरी बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई

देवगिरी बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई
माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला अटक; ५.३३ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
जळगाव : देवगिरी नागरी सहकारी बँकेची तब्बल ५ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत उन्मेष पाटील यांचे मेव्हणे प्रशांत राजेंद्र वाघ यांना चाळीसगाव येथून अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने संशयिताला ३० मेपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
औद्योगिक कर्जातून फसवणुकीचा आरोप
‘उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या नावावर घेतलेले औद्योगिक कर्ज थकीत राहिल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून वारंवार संधी देऊनही कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने पुढील कार्यवाही सुरू केली. दरम्यान, बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी परवानगी न घेता संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चौघांविरोधात गुन्हा
या प्रकरणी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
जामीन फेटाळल्यानंतर अटकेची कारवाई
गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधितांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रशांत वाघ वगळता इतर तिघांना अंतरिम जामीन मिळाला होता. त्यामुळे प्रशांत वाघ यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती.
चाळीसगावातून ताब्यात
आर्थिक गुन्हे शाखेला प्रशांत वाघ हे चाळीसगाव शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री त्यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
राजकीय वर्तुळात खळबळ
सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदारांच्या निकटवर्तीयावर अटकेची कारवाई झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणती माहिती समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






