अपयशाने खचू नका, कठोर परिश्रमाने यश निश्चित – पीआय जयश्री पाटील

अपयशाने खचू नका, कठोर परिश्रमाने यश निश्चित – पीआय जयश्री पाटील
भुसावळ: म्युनिसिपल हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी आणि सध्या नेरळ (मुंबई) रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक (पीआय) म्हणून कार्यरत असलेल्या जयश्री पुरुषोत्तम पाटील यांचा त्यांच्याच शाळेत गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी आपले अनुभव सांगताना विद्यार्थ्यांना प्रेरित केले. दहावीत नापास झाल्यानंतरही त्यांनी हार न मानता केलेल्या कठोर परिश्रमामुळे आज त्या उच्च पदावर पोहोचल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
दहावीतील अपयश यशाची पहिली पायरी ठरले
शाळेला सदिच्छा भेट दिल्यानंतर बोलताना जयश्री पाटील अतिशय भावुक झाल्या. त्यांनी आपल्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “दहावीत नापास होणे म्हणजे आयुष्याचा शेवट नाही,” असे सांगत, “नापास होणे ही यशाची पहिली पायरी आहे, आणि नंतर प्रयत्न करून यशस्वी होणे हा आयुष्याचा पहिला अनुभव आहे,” असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे यांनी जयश्री पाटील यांच्या यशाचे कौतुक केले. ते म्हणाले, “लहानपणी जयश्री अतिशय हुशार होत्या, पण योग्य मार्गदर्शनाअभावी त्या दहावीत नापास झाल्या. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज भरला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांची निवड झाली. नोकरी लागल्यानंतरही त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले आणि त्या पदवीधर झाल्या. घरची हलाखीची परिस्थिती असूनही त्यांनी कठोर मेहनत, अभ्यास आणि सहनशीलतेच्या जोरावर आज हे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी या गुणांचा अंगीकार केल्यास तेही जयश्री मॅडमसारखे यशस्वी होऊ शकतील,” असे ते म्हणाले.
शिक्षिका संध्या धांडे आणि ज्योती शिरतुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र राठोड यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.






