Other

अवघ्या दोन तासांत दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; निजामपूर पोलिसांची धडक कारवाई 

अवघ्या दोन तासांत दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; निजामपूर पोलिसांची धडक कारवाई 

महिलेचा गळा आवळून खून; पुरावा लपविण्यासाठी तिच्या मित्राचीही हत्या, आरोपी ताब्यात

साक्री : निजामपूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या दोन तासांत दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करत संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर तिच्या मित्रालाही लोखंडी टॉमीने मारहाण करून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

दि. १६ मे रोजी रायपूर ते वरधाने (ता. साक्री) मार्गावरील रस्त्यालगत सुझुकी अॅक्सेस मोटारसायकलजवळ एका महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडलेला असल्याची माहिती निजामपूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेहाशेजारी सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी महिलेची ओळख जयश्री रजनीकांत काकुस्ते (हिरे), रा. कासारे ता. साक्री अशी पटवली. चौकशीत संबंधित महिला पूजा विधीसाठी जैताणे शिवारात गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय आणि तांत्रिक तपास सुरू करत संशयित योगेश बापू खैरनार (रा. जैताणे, ता. साक्री) याला ताब्यात घेतले.

सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पूजा विधीनंतर महिलेस घरी सोडण्यासाठी जात असताना तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करत आरडाओरड सुरू केल्याने आरोपीने तिचा गळा आवळून खून केल्याचे त्याने सांगितले.

यानंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. मृत महिलेचा मित्र अक्षय गंगाधर सोनवणे (रा. जैताणे) याने महिलेबाबत विचारणा केल्याने आरोपी घाबरला. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने अक्षय सोनवणे याच्या डोक्यावर व बरगड्यांवर लोखंडी टॉमीने वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह जंगलातील काटेरी झुडपात फेकून जाळण्याचाही प्रयत्न केल्याची कबुली आरोपीने दिली.

निजामपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी योगेश बापू खैरनार याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, २३८ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, नामदेव सहारे, मधुकर सोमासे व निजामपूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button