माजी आ.डॉ.अपूर्व हिरेंनी घेतली महाजन दाम्पत्याची भेट
महा पोलीस न्यूज | ४ एप्रिल २०२४ | जळगाव शहर मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी कालच मुक्ताईनगर येथे एकनाथराव खडसेंची भेट घेऊन चर्चा केली असताना आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एक राजकीय पदाधिकारी महाजनांच्या भेटीला पोहचले आहेत. माजी शिक्षक आमदार डॉ.अपूर्व हिरे यांनी महाजन दाम्पत्याच्या घरी भेट देऊन सविस्तर चर्चा केली.
भाजप खा.उन्मेष पाटील आणि पारोळा नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात मोठा वाटा असलेले जळगाव शहर मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन सध्या चांगलेच चर्चेत आहे. मुंबईतून जळगावात पोहचताच सुनील महाजन यांनी मुक्ताईनगर येथे फार्म हाऊसवर आ.एकनाथराव खडसे यांची भेट घेत चर्चा केली होती. महाजन – खडसेंच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
दरम्यान, नाशिक शिक्षक मतदार संघ (विधान परिषद) माजी आ.डॉ.अपूर्व हिरे यांनी शुक्रवारी माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी विरोधी पक्षनेते डॉ.सुनील महाजन यांच्या घरी भेट देऊन चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात असून डॉ.हिरे यांना मानणारा मोठा गट, विशेषतः शिक्षकवर्ग जिल्ह्यात असून त्याचा फायदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. महाजन दाम्पत्य शहराच्या नव्हे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.