अखेर नाशिक पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे!

महा पोलीस न्यूज | ३ जून २०२४ | नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक कोण होणार? याबाबत गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता लागून होती त्यातच तात्पुरता पदभार रंजनकुमार शर्मा यांना दिल्याने आणखींच भर पडली होती. अखेर शासनाने सोमवारी बदलीचे आदेश काढले असून नाशिक परिक्षेत्र महानिरीक्षक म्हणून दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक असलेले बी.जी.शेखर यांची गेल्या वर्षाच्या अखेरीस बदली करण्यात येऊन त्यांच्या जागी दत्तात्रय कराळे यांची वर्णी लागली होती. सेवानिवृत्तीला काही महिने बाकी असताना बदली करण्यात आल्याने बी.जी.शेखर यांनी बदली आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. नियमानुसार सेवानिवृत्तीला काही महिने बाकी असताना बदली होत नसल्याचे सांगत त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने बदली प्रक्रिया थांबली होती. ३१ मे २०२४ रोजी पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचा कार्यकाळ सेवानिवृत्तीमुळे संपुष्टात आल्याने तात्पुरता पदभार रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला होता. देशातील निवडणूक प्रक्रिया १ जून रोजी पार पडल्यावर आचारसंहिता काहीशी शिथील झाली होती.
सोमवारी शासनाने पदस्थापनेचे आदेश पारीत करीत नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक म्हणून दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दत्तात्रय कराळे यांनी यापूर्वी जळगाव जिल्हा पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.