शनिपेठ पोलिसांनी नेत्रमच्या साहाय्याने पकडले मोबाईल चोर

महा पोलीस न्यूज । १५ जुलै २०२४ । जळगाव शहरात दुचाकीवर फिरून नागरिकांचे मोबाईल लांबवण्याच्या घटना वाढल्या होत्या. शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी नेत्रम कक्षाच्या माध्यमातून मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अल्पवयीन मुलाच्या मदतीने ते गुन्हे करीत असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांकडून ६ मोबाईल आणि एक चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील नेरीनाका परिसरात रस्त्यावर उभे राहून मोबाईल बघत असलेल्या राजू पुरुषोत्तम नारखेडे (रा.भवानी पेठ) यांच्या हातातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावून ते पसार झाले होते. ही घटना २ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या महिन्यात अशा प्रकारचे मोबाईल स्नॅचिंगसह सोनसाळखी लांबविल्याच्या घटना रामानंद व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला संशयिताच्या शोधार्थ रवाना केले होते. गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी तपाचक्रे फिरवित तात्काळ शहरातील नेत्रमच्या पथकातील महेश वर्मा, पोकॉ मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास, पंकज खडसे, मोहसीन शेख यांच्या मदतीने शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
सीसीटीव्ही फुटेज आणि पथकाला मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी अजहर आलम अन्सारी (रा. कात्रज, पुणे, ह. मु. तांबापुर), फैजान खान आरिफ खान (रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा) यांच्यासह एक विधीसंघर्षीत बालकाला तांबापुरातून ताब्यात घेतले. दुचाकीवर येत मोबाईल लांबवणारे दोघे चोरटे अल्पवयीन मुलाच्या मदतीने मोबाईल लांबवित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
चोरट्यांकडून सहा मोबाईलसह चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ विजय खैरे, पोकॉ अनिल कांबळे, राहुल घेटे, राहुल पाटील, योगेश साबळे, रविंद्र तायडे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने केली आहे.