
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या ऐकावे ते नवलच अशी परिस्थिती आहे. गेल्याच आठवड्यात उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या कुंटणखान्यातून एका बांगलादेशी तरुणीची सुटका करण्यात आली होती. त्यातच गणेश कॉलनी परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत एक महिला कुंटणखाना चालवत असल्याच्या संशयावरून मोठा वाद झाला. मध्यरात्री नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्या फ्लॅटची झडती घेतली असता त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत एक पुरुष आणि एक महिला कर्मचारी मिळून आले. दोन दिवस जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गोंधळ चालला मात्र अद्याप ठोस मार्ग निघाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कॉलनी परिसरात असलेल्या उच्चभ्रू सोसायटीत एका महिलेने फ्लॅट खरेदी केला होता. त्या फ्लॅटमध्ये संबंधीत महिला कुंटणखाना चालवत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसात केली होती. एकदा पहाटे ६ वाजताच नागरिकांनी त्याठिकाणी धडक दिली आणि पोलिसांना बोलावले. त्यानंतर त्या महिलेने तो फ्लॅट दुसऱ्या महिलेला १९ लाखात विक्री केला.
पुन्हा तोच कित्ता फिरवला जात असल्याचा संशय
तो फ्लॅट खरेदी केलेली महिला देखील आपल्या घरात कुंटणखाना चालवत असल्याचा संशय नागरिकांना आहे. दुचाकीवर पोलीस लिहिलेला एक तरुण दिवसरात्र केव्हाही त्याठिकाणी येत असतो. तसेच काही तरुण-तरुणी देखील केव्हाही ये-जा करतात. रहिवासी नागरिकांनी अनेकदा तक्रार केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. संबंधित महिला फ्लॅट विक्री देखील करत नाही आणि हे प्रकार देखील थांबत नसल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले होते.
त्या रात्री अखेर ते घडलेच..
सोमवारी रात्रीच्या सुमारास एक दुचाकीवर एक पुरुष तर दुसऱ्या दुचाकीने एक महिला त्या फ्लॅटमध्ये शिरले. बराच वेळ ते बाहेर येत नव्हते तर फ्लॅटमधून आवाज येत असल्याने इतर फ्लॅट मालक महिला, पुरुष एकत्र जमले. त्यांनी थेट त्या फ्लॅट मालकीण महिलेला जाब विचारला. बाहेरून आलेल्या जोडीने अगोदर पती-पत्नी सांगितले तर दोन्ही महिलांनी देरानी-जेठानी सांगितले. दोघांच्या नात्यावर विश्वास नसल्याने नागरिकांनी त्यांना आधार कार्ड मागितले. ते न देत त्यांनी फ्लॅटला आतून कडी लावली. अगोदर संतापलेल्या रहिवाशांनी अखेर पोलिसांना पाचारण केले.
पीडब्ल्यूडीचे दोघे आणि रहिवासी पोलीस ठाण्यात
रहिवाशांनी अगोदर डायल ११२ ला तक्रार केली मात्र ती जिल्हापेठ ऐवजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात वर्ग झाल्याने पोलिसांनी येण्यास असमर्थता दर्शविली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचा दूरध्वनी कुणीही घेत नसल्याने त्यांनी नियंत्रण कक्षात तक्रार केली. दुसरीकडे एकाने उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना कळवले. अखेर तासाभराने पोलीस पोहचले. फ्लॅटमध्ये धडक देत विचारणा केली असता एक महिला आणि एक पुरुष पीडब्ल्यूडीचे विभागाचे कर्मचारी असल्याचे समोर आले मात्र दोघेही एकमेकांचे नातेवाईक नव्हते. ते आणि तिसरी महिला असे गोवा जाण्याचे नियोजन करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. गोवा जाणारी फ्लाईट ८ वाजता होती तरी तिघे ११ वाजेपर्यंत घरातच असल्याने पोलिसांना संशय आला. अखेर तिघांसह सर्व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोहचले.
दोन दिवसात तोडगा नाहीच
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री १ वाजेपर्यंत सर्व गोंधळ चालला मात्र त्यात मार्ग न निघाल्याने पोलीस निरीक्षकांनी सर्वांना मंगळवारी बोलावले. पोलिसांनी कारवाई करायची तर ते पीटा एक्टमध्ये मोडत नसल्याने त्यांची पंचाईत झाली. दुसऱ्या दिवशी देखील या वादावर पूर्णता तोडगा निघू शकलेला नाही. रहिवासी आणि फ्लॅट मालक महिला यांच्यातील तो वाद अद्यापही धुमसतच असून पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.