अंगावर वीज पडल्याने चाळीस वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
एरंडोल तालुक्यातील खर्ची रवंजा येथील घटना

अंगावर वीज पडल्याने चाळीस वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
एरंडोल तालुक्यातील खर्ची रवंजा येथील घटना
एरंडोल, महा पोलीस न्यूज l दि. १६ मे २०२५l एरंडोल तालुक्यातील खर्ची रवंजा गावात वीज पडून एका ४० वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (१६ मे) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचे नाव शरद रामा भिल्ल असून, ते मूळचे कमतवाडी (ता. धरणगाव) येथील रहिवासी होते.
शरद भिल्ल हे आपल्या सासऱ्यांकडे लक्ष्मण श्रावण ठाकरे, रा. खर्ची रवंजा येथे आले होते. त्याचदरम्यान अचानक आलेल्या वादळी पावसात विजेचा जोरदार कडकडाट झाला आणि त्यात शरद भिल्ल यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे एएसआय राजेश पाटील व हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, अचानक घडलेल्या या अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.