प्रेषितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाझिया खानला अटक करा

प्रेषितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाझिया खानला अटक करा
जळगावात सुन्नी मुस्लिम बांधवांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
जळगाव: प्रतिनिधी इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) आणि त्यांच्या पत्नीबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाझिया इलाही खान याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज जळगाव जिल्ह्यातील सुन्नी मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. आरोपीला तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, नाझिया इलाही खान याने प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) आणि त्यांच्या पत्नीबद्दल अत्यंत चुकीची आणि आक्षेपार्ह विधाने करून अवमान केला आहे. या विखारी वक्तव्यामुळे जगभरातील व जिल्ह्यातील समस्त सुन्नी मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. समाजात शांतता व सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न असून, अशा प्रवृत्तीला पोलिसांनी कडक चपराक लगावावी आणि त्याला लवकरात लवकर गजाआड करावे.
या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा जिल्ह्यातील सुन्नी मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करतील, असा इशारा मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदन सादर करतेवेळी सुन्नी जामा मशीद, जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट, जळगावचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, रशीद कुरैशी, सय्यद उमर, फारूख शौकत तंवर, अमान बिलाल, मुस्तकीम हमीद, परवेझ पटवे आणि मोईन अली यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






