ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिली धडक, महिलेचा जागीच मृत्यू

ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिली धडक, महिलेचा जागीच मृत्यू
कुसुंबा गावाजवळील घटना
जळगाव प्रतिनिधी
भाजीपाला घेण्यासाठी रिक्षाने जाणाऱ्या महिलेचा ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेमध्ये झालेल्या अपघातात लोहारा येथील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 25 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास कुसुंबा गावाजवळ घडली. या अपघातानंतर बस चालकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रत्नाबाई गणेश हिवाये वय 40 लोहारा पाचोरा असे मयत महिलेचे नाव आहे.
सूत्राने दिलेली माहिती अशी की रत्नाबाई हिवाये या लोहारा येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्या लोहारा येथून जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी गावातील एका रिक्षाने जात असताना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास एका ट्रॅव्हल्सने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा पलटी झाली. यात बसलेल्या रत्नाबाई या अपघातामध्ये फेकल्या गेल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर रिक्षातील चालक बापू भास्कर चौधरी आणि गणेश बाबुलाल जाधव हे दोन जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी सिद्धी कॉलनी येथून ट्रॅव्हल्स सह चालकाला ताब्यात घेतले आहे. मयत रत्नाबाई यांच्या पश्चात पती मुलगा असा परिवार आहे. दरम्यान या घटनेमुळे लोहारा गावात हळहळ व्यक्त होत आहे.