Crime

ब्रेकिंग : जळगावात कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट, २७ वर्षीय तरुणाची हत्या!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी सुमारे एक वाजता घडली. सनी विनोद डोळे (वय २७, रा.शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे याला पोलिसांनी अटक केली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक वादातून थेट हल्ला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याचा मेहुणा सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यात काही कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान हिंसक घटनेत झाले. यावेळी संशयित सुरज याने सनीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला.

रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित
हल्ल्यानंतर जखमी सनीला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अवघ्या २७व्या वर्षी त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आजीलाही दुखापत; रुग्णालयात आक्रोश
या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती आहे. सनीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून संशयिताला अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणातील संशयित सुरज वानखेडे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

कौटुंबिक वादातून घडलेल्या या गंभीर घटनेने शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात पुढील पोलीस तपासातून अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button