Politics

जळगाव विधान परिषद : शिवसेनेत ट्विस्ट, भाजपची कमांड कोअर कमिटीच्या हाती!

अनिल चौधरी, सुमीत पाटलांच्या नावाने रस्सीखेच वाढणार, भाजपात चंदूभाई पटेलांच्या नावाची पुन्हा चर्चा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांचा बिगुल सोमवारी वाजल्यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेकडून अगोदर एकच नाव पुढे येत होते मात्र आता आणखी दोन नावे समोर येत असल्याने रस्सीखेच वाढणार आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटातील गर्दीत पुन्हा चंदूभाई पटेल यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या तरी भाजपचे पारडे जड वाटत असले तरी राज्यात काही जागांची अदलाबदल झाली तर शिवसेनेला जागा सुटू शकते.

राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जळगाव जिल्ह्यात उमेदवार कोण? यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जळगावात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली असली तरी संख्याबळ लक्षात घेता भारतीय जनता पक्षाचे वजन जास्त आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संख्याबळ आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वैयक्तिक संबंधाच्या बळावर ते देखील या जागेसाठी आग्रही राहू शकतात.

असे आहे जिल्ह्यातील संख्याबळ
जळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ५६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान करू शकणाऱ्या मतदारांची संख्या लक्षात घेता महा विकासआघाडीकडे केवळ ७४ मतदारांचे संख्याबळ असून, अद्याप कोणत्याही संभाव्य उमेदवाराचे नाव समोर आलेले नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्याने ६८ जिल्हा परिषद सदस्य आणि १५ पंचायत समिती सभापती मतदानापासून वंचित राहणार आहेत. भाजपचे हक्काचे २४९ मतदार असून शिवसेनाकडे २०२ मतदार आहेत.

भाजपची यादी मोठी, कोअर कमिटी निर्णायक
भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची यादी मोठी असली तरी संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द जिल्ह्यात अंतिम असतो. राज्यातील उमेदवार निश्चित करताना अंतिम निर्णय कोअर कमिटीच घेईल. भाजपाकडून नंदू अडवाणी, डॉ.केतकी पाटील, नंदू महाजन, रोहीत निकम, अमोल शिंदे, सूरज झंवर यांची नावे चर्चेत आहेत. मावळते आमदार चंदूभाई पटेल यांचे नाव चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरत नवीन चेहरा देखील मैदानात उतरवू शकते.

शिवसेनेच्या गोटात खलबते, चौधरींच्या नावाने वादळ
जिल्ह्यातील शिवसेनेचे संख्याबळ कमी असले तरी त्यांच्याकडून विधान परिषदेच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर होते मात्र निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील यांचा मुलगा सुमीत पाटील यांचे नाव देखील चर्चेत आले आहे, मात्र त्यांना वयाची अडचण येऊ शकते. तसे झाल्यास किशोर पाटील दुसऱ्या उमेदवाराची शिफारस करू शकतात. २०१० मध्ये मनीष जैन, निखील खडसे यांच्या विरोधात विधान परिषद निवडणूक लढवत भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी चांगलीच मते घेतली होती. अनिल चौधरी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने ते देखील उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button