जळगावच्या पोलिसाने लिहिले पोलीस महासंचालकांवर पुस्तक

महा पोलीस न्यूज | ११ जुलै २०२४ | माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे आपल्या कार्यशैलीमुळे महाराष्ट्र पोलीस दलात प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दर आठवड्याला ते महाराष्ट्र पोलिसांची संवाद साधत असत, त्यांच्या या कार्याची चिकित्सात्मक मांडणी करणारे काळजातील पोलीस महासंचालक हे पुस्तक जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी लिहिले आहे. या अगोदरही अहिरेंचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘मृत्यू घराचा पहारा’ आणि ‘हुंकार वेदनेचा’ ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
एका पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस महासंचालकांवर पुस्तक लिहावे ही महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासातील पहिलीच घटना असली पाहिजे, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणत आहेत. संजय पांडे यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक पद अकरा महिने सांभाळले. या काळात त्यांनी पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. या अगोदर पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ रजा वर्षाला बारा मिळत असत, पोलिसांचे एकंदरीत कार्य पाहता त्यांना पुरेशा त्या नाहीत याचा पांडे यांनी राज्य शासनाची पाठपुरावा करून बारावरून वीस किरकोळ रजा केल्या.
तसेच या अगोदर पोलीस कर्मचारी हे पोलीस कर्मचारी म्हणून भरती होत होते आणि कर्मचारी म्हणूनच निवृत्त होत असत. संजय पांडे हे पोलीस महासंचालक असताना सदर बाब शासनाला अहवाल पाठवून आता प्रत्येक पोलीस कर्मचारी हा पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त होईल, अशी करवून घेतली. याचबरोबर ते दर आठवड्याला पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कोणती कामे झाली याचा देखील अहवाल फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीसदलाला सादर करत होते. तसेच राज्य राखीव पोलीस बलाच्या वेळापत्रक देखील त्यांनी बदलले आहे.
पुस्तकामध्ये २९ प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणांमध्ये संजय पांडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतलेला आहे. त्यात विशेष करून कॉन्स्टेबल राज्याचा डीजीपी झाला पाहिजे, फेसबुक लाईव्ह, पोलीस महासंचालकांचा सुखद धक्का, प्रत्येक पोलीस कर्मचारी होणार अधिकारी या प्रकरणाचा समावेश आहे. विनोद अहिरे हे पांडे साहेबांबद्दल एका प्रकरणात म्हणतात की, मानवी सन्मानासाठी आरपारच्या चळवळी सुरू होतात, समाज बदलत जातो, सन्मान माणसांना निर्भयपणे वागण्याची ऊर्जा देतो तोच सन्मान पांडे साहेबानी पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
पोलीस कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र पोलीस दलात किती सुधारणा झाल्या, काय केले, तसेच काय करायचे राहिले हा भाग गौण आहे, पण त्यांनी आपण काय काम करतो आहे, काय करणार आहे, कोणती कामे झालेली आहे, कोणत्या कामाला यश आलं, कोणती कामं रखडली, यांची इत्यंभूत माहिती फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस दलाला ते देत राहिले. एखाद्या कामाचे अपयशाबद्दल त्यांनी सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांना स्वारी म्हणायला देखील सुद्धा मागे पुढे पाहिले नाही. हे सगळं माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच घडत होते.
पांडे साहेबांनी त्यांच्या कार्याने, त्यांच्या वाणीने, पोलीस कर्मचाऱ्यांच्या काळजाला स्पर्श केला होता म्हणूनच माझ्यासारख्या सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्याने लेखणी हातात घेतली आणि जन्म झाला ‘काळजातील पोलीस महासंचालक’ या शीर्षकाचा/पुस्तकाचा. पुस्तकाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रस्तावना दिलेली असून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक प्रमोद पवार यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रकाशनापूर्वीच पहिली आवृत्ती संपलेली असून लवकरच जळगावमध्ये प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.