महा पोलीस न्यूज इम्पॅक्ट : स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध प्रकार, PITA Act नुसार छापा; ६ महिलांची सुटका!
दामिनी पथकाची स्पा 99 वर कारवाई : स्पा मालक व जागामालकावर गुन्हा


महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील स्पा सेंटरच्या आडून कथित गैरप्रकार सुरू असल्याच्या चर्चांना आता पोलिसांच्या कारवाईने गंभीर वळण मिळाले आहे. दामिनी पथकाने Act अंतर्गत CR No. 276/2026 दाखल करून संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकला असून, सहा महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणात स्पा मालकासह संबंधित जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ‘महा पोलीस न्यूज’ने यापूर्वीच जळगावातील स्पा सेंटरच्या कथित गैरप्रकारांवर सवाल उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्या वृत्तानंतर झालेल्या कारवाईमुळे स्पा सेंटर चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. रिंगरोडच्या सुरुवातीला असलेल्या चौकातीलच आरसी टॉवरमधील स्पा ९९ मध्ये दामिनी पथकाने आणि मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
स्पाच्या नावाखाली नेमके काय सुरू होते?
पोलिसांच्या कारवाईनुसार, संबंधित आस्थापनात स्पा आणि मसाज सेवांच्या नावाखाली व्यावसायिक लैंगिक सेवा चालविल्या जात असल्याचा आरोप आहे. अशा प्रकारच्या व्यावसायिक लैंगिक सेवांवर अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, 1956 अर्थात ITPA/PITA Act अंतर्गत कारवाईची तरतूद आहे. छाप्यात पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली. त्यांचे वय २६ ते ३७ वर्षांच्या दरम्यान असून, त्या मसाज थेरपिस्ट म्हणून काम करत असल्याचे तपशीलात नमूद आहे.
परप्रांतीय तरुणींची सुटका
कारवाईत पश्चिम बंगाल, मणिपूर आणि सिक्कीम येथील महिलांचा समावेश आहे. एका महिलेचे वास्तव्य बांके, नेपाळ येथे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित महिलेच्या पासपोर्ट, व्हिसा स्थिती आणि भारतातील वास्तव्याबाबतची कागदपत्रे तसेच सीमापार प्रवासाची पार्श्वभूमी तपासली जात आहे.
मालक आणि जागामालक दोघेही पोलिसांच्या रडारवर
या प्रकरणात नीरजसिंग पंड्या याच्यावर स्पाचा मालक व परवानाधारक म्हणून त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. स्पा आस्थापनाच्या आडून कथित व्यावसायिक लैंगिक व्यापार चालविणे, त्याचे व्यवस्थापन करणे आणि त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असल्याचे पोलिस तपशीलात नमूद आहे. तर राजेंद्र पुंडलिकराव चव्हाण या जागेचा मालक असल्याचे नमूद आहे. कथित बेकायदेशीर कारवायांसाठी वापरली गेलेली जागा त्याने भाड्याने दिल्याचा आरोप आहे. दोघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘महा पोलीस न्यूज’ने आधीच दिला होता इशारा!
जळगावातील स्पा सेंटर पुन्हा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘महा पोलीस न्यूज’ने यापूर्वीच ‘जळगावात स्पा सेंटर पुन्हा फुल्ल; कारवाईचा धसका संपला की पाठबळ पुन्हा मिळाले?’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तातून स्पा सेंटरची कायदेशीरता, परवाने, कामगारांची कागदपत्रे, नियमांचे पालन आणि कथित गैरप्रकारांबाबत प्रशासनाने नियमित तपासणी करावी, अशी भूमिका मांडण्यात आली होती. आता PITA Act अंतर्गत झालेल्या कारवाईमुळे स्पा सेंटरच्या नावाखाली नेमके काय सुरू होते आणि यामागे आणखी कोणाची भूमिका आहे का? याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
फक्त छापा नको; सर्व स्पा सेंटरची तपासणी करा!
कारवाईनंतर आता शहरातील इतर स्पा आणि मसाज सेंटरकडेही पोलिस व संबंधित विभागांचे लक्ष जाणे गरजेचे आहे. प्रत्येक आस्थापनाचा परवाना, प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप, कामगारांची कागदपत्रे आणि लागू नियमांचे पालन तपासले पाहिजे. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना विनाकारण त्रास होऊ नये; मात्र कायद्याच्या आडून गैरप्रकार सुरू असतील तर मालक, व्यवस्थापक, जागामालक आणि संबंधित इतर व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.







