
महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर तालुक्यातील हिंगोणे ते फाफोरे शिवारात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, बोरी नदीच्या पात्राची उघड लूट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मध्यरात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या या अवैध कारवायांकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मध्यरात्रीच ‘ऑपरेशन वाळू लूट’
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, दररोज रात्री उशिरा जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने बोरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जातो. कोणतीही भीती न बाळगता माफिया टोळ्या खुलेआम नदीचा ऱ्हास करत आहेत. ही चोरी केलेली वाळू लगेचच हिंगोणे-फाफोरे परिसरातील शेतांमध्ये साठवली जात आहे.

खळेश्वर मंदिर परिसर बनला ‘बेकायदेशीर डेपो’
संपूर्ण रॅकेटचा केंद्रबिंदू ठरत आहे तो खळेश्वर मंदिर परिसर. मंदिराच्या मागील बाजूस वाळूचे प्रचंड ढीग उघड्यावर रचलेले दिसत असून, येथे जणू अधिकृत वाळू डेपोच उभारला आहे की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. श्रद्धास्थानाच्या परिसरातच सुरू असलेला हा प्रकार संतापजनक ठरत आहे.
महसूल विभागावर संशयाची सावली
इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध साठ्यांवर महसूल प्रशासनाचे अधिकारी अद्यापही मौन बाळगून आहेत. “हे केवळ दुर्लक्ष नसून संगनमतच आहे का?” असा थेट सवाल आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत. कारवाईचा केवळ दिखावा करून प्रत्यक्षात माफियांना मोकळे रान दिले जात असल्याची चर्चा रंगत आहे.

शासनाला कोट्यवधींचा फटका, पर्यावरण धोक्यात
अवैध वाळू उपशामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे नदीपात्राची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. भविष्यात पूरस्थिती आणि भूगर्भीय धोके वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांचा इशारा: ‘कारवाई करा, नाहीतर आंदोलन’
स्थानिक नागरिकांनी आता प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतमालक आणि वाळू माफियांवर कडक कारवाई करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू,” असा संतप्त इशारा देण्यात आला आहे.

ही परिस्थिती केवळ स्थानिक प्रश्न नसून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, जबाबदार यंत्रणा खरोखरच जागी होते की ही ‘वाळू लूट’ अशीच सुरू राहते.






