Crime

ब्रेकिंग : जळके शिवारात प्रौढाची निर्घृण हत्त्या; संशयीत फरार

शिरसोलीतील संशयितावर खुनाचा संशय; एमआयडीसी पोलिसांची जिल्हा रुग्णालयात धाव

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव तालुक्यातील जळके शिवारात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगडाने किंवा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि.९ रोजी दुपारी उघडकीस आली. गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, रा.अंतुर्ली, हल्ली मुक्काम पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मुकुंदा पाटील (रा.शिरसोली) याच्यावर खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे येथे राहणारे गोरख ठाकूर हे गेल्या आठ दिवसांपासून शिरसोली येथील त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्वर राजाराम ठाकूर यांच्याकडे आले होते. सोमवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या जळगाव तालुक्यातील जळके शिवारात असलेल्या शेतात गेले होते. याच ठिकाणी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर दगडाने किंवा धारदार हत्याराने जोरदार वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, शेतात काहीतरी वाद सुरू असल्याची माहिती संशयिताच्या नातेवाईकाकडून घरी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीतून मुकुंदा पाटील याच्यावर खुनाचा संशय व्यक्त केला जात असून, नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला आणि खुनामागील कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह एलसीबी पथकाने घटनास्थळी आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. संशयिताचा शोध सुरू असून याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button