
प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी भडगावच्या विद्यार्थ्यांची सामूहिक शपथ
सौ. सु. गि. पाटील विद्यालयाचा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प
भडगाव, प्रतिनिधी : दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करून हवा व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी भडगाव येथील सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयात ३ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना ‘प्रदूषणमुक्त दीपावली’ची सामूहिक शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.
विद्यालयाच्या सकाळच्या शालेय परिपाठादरम्यान उपशिक्षक श्रद्धेश तळेगावकर यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना ही शपथ दिली. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर हवा आणि ध्वनी प्रदूषण होते. त्याचा मानवी आरोग्यासह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण तसेच पशुपक्ष्यांवरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः फटाके न वाजवता कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करून विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश दिला.
या वेळी संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक तथा प्राचार्य अजय अहिरे, उपमुख्याध्यापिका छाया व्ही. बिऱ्हाडे, उपप्राचार्य संदीप सोनवणे, पर्यवेक्षक अशोक तायडे, शरद महाजन, नितीन सोनजे, डी. पी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.







