
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । गोमातेच्या सेवेला समर्पित असलेल्या पालधी येथील ‘साई गोशाळा’चा उद्घाटन महोत्सव रविवार, १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून, महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पालधी येथील युगश्री जय साई वेअर हाऊस परिसरातील साई गोशाळेत हा धार्मिक व मंगलमय सोहळा पार पडणार आहे. सकाळी ११.४५ वाजता गोपूजन आणि छप्पन भोगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, आमदार बालासाहेब सानप, आमदार गोकुळ गीते, आमदार गणेश गीते, आमदार देवयानी फरांदे, सुरेशदादा जैन, रोहन घुगे (जिल्हाधिकारी, जळगाव), आदित्य जिवने (आयुक्त, जळगाव महानगरपालिका), श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, जळगाव) आणि करिश्मा नायर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
साई गोशाळेच्या या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट (साई बाबा मंदिर), पालधी यांच्या वतीने देण्यात आले आहे. गोसेवेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या सोहळ्याला भाविकांनी व नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांसाठी भोजनप्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे. गोमातेची सेवा, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सहभाग यांचा संगम असलेला हा उद्घाटन महोत्सव पालधी परिसरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.







