खाकी पाझरली : विद्यार्थिनीला मिळाली नवीन सायकल
महा पोलीस न्यूज | १२ मार्च २०२४ | खाकी नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून येत असते. जळगाव शनिपेठ पोलीस ठाण्याकडून असेच एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवण्यात आले आहे. मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबात एका आगीत सायकलसह दुचाकी जळून खाक झाल्याने मुलीने पोलिसांकडे खंत व्यक्त केली. खाकीतील माणुसकी लगेच पाझराली आणि आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने त्यांनी विद्यार्थिनीला नवीन सायकल घेवून दिली.
जळगाव शहरातील माधव नगरात अमोल रमेश जंगले हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीझेड.३६९८ या दुचाकीने अचानक पेट घेतला. आगीत दुचाकीसह त्यांची मुलगी अक्षरा हीचे सायकल देखील जळून खाक झाली. शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी रविंद्र परदेशी व पोहेकॉ विजय पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. चिमुकलीची शाळा तिच्या घरापासून सुमारे सहा किमी लांब होती. तिची सायकल जळून खाक झाल्याने चिमुकल्या अक्षराला पायीच शाळेत जावे लागत होते.
रविंद्र परदेशी व विजय पाटील या दोघ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत व चिमुकलीच्या शिक्षणामध्ये अडचण निर्माण होवू नये म्हणून त्यांनी लागलीच काही मित्रांशी संपर्क साधला. आपल्या परिचयातील संदीप इंधाटे, प्रकाश वाघ, ज्ञानेश्र्वर गावंडे, भूषण पाटील, अविनाश पाटील, बंटी राणे, गिरीश पाटील या उद्योजकांनी मदतीचा हात पुढे करीत चिमुकलीला नवीन सायकल भेट दिली. शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह उद्योजकांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी चिमुकल्या अक्षराला नवीन सायकल भेट देण्यात आली. सायकल मिळताच चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हास्य बघून सर्वच भावूक झाले होते.