जवाहर नवोदय विद्यालय येथे विभागीय स्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन व थाटात उद्घाटन

जवाहर नवोदय विद्यालय येथे विभागीय स्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन व थाटात उद्घाटन
भुसावळ, (प्रतिनिधी) – पी.एम. श्री जवाहर नवोदय विद्यालय, भुसावळ येथे दिनांक २० ते २२ जुलै २०२५ दरम्यान विभागीय स्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. खंडारे, सौ. ज्योती खंडारे, भुसावळ हायस्कूलचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद शुक्ला, आंतरराष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक व राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, नाहाटा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. चंद्रशेखर सरोदे, डॉ. प्रमोद सोनवणे, अभिजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात एनसीसी कॅडेट्सच्या सलामीने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन, सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन आणि माल्यार्पण करून कार्यक्रमाला धार्मिक आणि शैक्षणिक साज चढवण्यात आला. प्रमुख अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून वातावरण उत्साही केले. प्राचार्य डॉ. खंडारे यांनी स्वागतपर भाषणात स्पर्धेचे स्वरूप आणि उद्दिष्ट स्पष्ट केले.
स्पर्धेत पुणे, अमरावती, गांधीनगर व अहमदाबाद या चार विभागांतील १८ नवोदय विद्यालयातील एकूण २८८ खेळाडू सहभागी झाले असून प्रत्येकी ३६ मुले आणि ३६ मुलींचा समावेश आहे. खेळाची सुरुवात परेड संचालनाने झाली असून यामध्ये पुणे विभागाने प्रथम क्रमांक पटकावत ट्रॉफी जिंकली. स्पर्धेपूर्वी मशाल प्रज्वलन, शपथविधी, मैदान पूजन, फित कापणे, नारळ फोडणे आणि आकाशात बलून व कबूतर सोडून उद्घाटन सोहळा पार पडला.
स्पर्धेच्या प्रारंभी १७ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे विभागाने अहमदाबादवर मात केली. तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पुणे संघाने गांधीनगर संघावर विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांमधून स्पर्धेची दमदार सुरुवात झाली.
उद्घाटनप्रसंगी खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना “पद कुठलेही असो, देशसेवेचा भाव महत्त्वाचा आहे. प्रामाणिकता, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा ही यशाची गुरुकिल्ली आहे,” असे सांगितले. त्यांनी विद्यालयासाठी खासदार निधीतून आधुनिक जिम सुविधा देण्याची घोषणा केली तसेच जळगाव जिल्ह्यात दुसरे नवोदय विद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन बलराम द्विवेदी आणि वैष्णवी यांनी केले. द्विवेदी यांनी आपल्या शेरोशायरीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यशस्वी आयोजनासाठी संजय सराटे, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी अजय धाराणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.