रोहीत निकमांची लागणार लॉटरी, पक्षश्रेष्ठी देणार बक्षीस!
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपात पडद्यामागे राहून बुथ मॅनेजमेंट करण्यात मोठी भुमिका निभावणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षाने दखल घेतली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी न मिळालेले रोहित निकम यांना मात्र विधानसभा निवडणुकीला संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्षासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत निकम यांची लॉटरी लागणार असे बोलले जात आहे.
जळगाव जिल्ह्यासह राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वत्र उमेदवारांनी तयारी सुरू केली असून मतदार संघात दौरे सुरू केले आहे. राज्यात महायुती आणि महाआघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट नसले तरी विद्यमान आमदार असलेल्या ठिकाणची जागा तोच पक्ष लढवणार अशी शक्यता आहे. त्यामुळेच जळगाव शहर विधानसभा मतदार संघाची जागा भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे.
लोकसभा निवडणूक नुकतेच पार पडली असता त्यात जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मिता उदय वाघ मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. स्मिता वाघ ५० हजारांपैकी कमी मतांनी विजयी होतील किंवा लढत चुरशीची असणार असा अंदाज सर्वच व्यक्त करीत होते. निकाल अनपेक्षित लागले आणि चक्क २ लाखांपेक्षा अधिकची आघाडी मिळाली. भाजपच्या मोठ्या मताधिक्क्यामागे केवळ बुथ मॅनेजमेंटची महत्त्वाची भुमिका आहे.
भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाची बुथ मॅनेजमेंटची जबाबदारी रोहित निकम यांच्याकडे होती. विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाल्यानंतर कार्यकर्त्यांना हाताशी धरणे, बुथ नियोजन करणे, नवीन बूथ उभारणे, सर्वांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी रोहित निकम यांनी चोख पार पाडली. लोकसभा निवडणुकीला इच्छुक असताना उमेदवारी मिळाली नाही तरी त्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले. त्याचेच फलित म्हणून निवडणुकीला यश आले.
लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचे बक्षीस रोहित निकम यांना भेटण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निकम यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित निकम यांचा सहकारातील अनुभव आणि लोकसभेला केलेलं नियोजन लक्षात घेता रोहित निकम यांना पक्षश्रेष्ठी संधी देऊ शकतात. सामाजिक आणि पक्षीय आकडेवारी लक्षात घेता जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाऊ शकते.