दिलजले : राँग नंबरने जुळले प्रेम, सहा वर्षांनी प्रेमभंग आणि तो निघाला जीव द्यायला..
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | प्रेमात मनुष्य कसा वेडापिसा होतो. प्रेमाचा लळा लागला की त्या प्रेमासमोर त्याला जगही लहान वाटू लागते पण त्याच प्रेमाचा भंग झाल्यास जीव नकोसा होऊन जातो. छत्रपती संभाजी नगरातील तरुणाचा सहा वर्षांपूर्वी रॉंग नंबर लागला आणि जळगावच्या एका युवतीशी त्याचे प्रेमाचं सूत जुळलं. पाच वर्ष आकंठ प्रेमात बुडालेल्या दोघांमध्ये अचानक काहीतरी बिनसलं आणि २०२३ च्या अखेरीस प्रेयसीने त्याला ब्लॉक केले. दोन महिने संपर्क करूनही भेट होत नसल्याने त्याने नोकरी सोडली आणि कुणालाही न सांगता थेट जळगावला गाठले. प्रेयसीचा शोध, प्रेमात आलेले अपयश, नैराश्यातून गाठलेला रेल्वे रूळ आणि जीव देण्याच्या विचाराचा शेवट काहीसा ‘कभी खुशी, कभी गम’वाला झाला. चला तर वाचूया अजब प्रेम की गजब कहानी.
छत्रपती संभाजीनगर येथील २६ वर्षीय तरुण तीन बहिणींच्या पाठीवरचा एकुलता एक मुलगा. तिन्ही बहिणी विवाहित तर आई-वडील वयस्कर. वडिलांनी हॉटेल व्यवसायात कार्यरत राहून मुलाला लहानाचे मोठे केले. तरुणाने बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. शिक्षणाच्या बळावर त्याला हॉटेलमध्ये खाजगी नोकरी देखील लागली. दोन-तीन हॉटेल बदलल्यावर तो बऱ्यापैकी स्थिर झाला. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली, ती त्याचे केवळ आकर्षण असल्याने त्याने तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण २०१८ मध्ये एक रॉंग नंबर लागला आणि त्याच्या ‘लवस्टोरी’ला सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यातील एका तरुणीसोबत त्याच्या प्रेमाची तार छेडली गेली.
दोघांचं प्रेम दिवसेंदिवस फुलत गेले. दोघांच्या भेटीगाठी झाल्या, तरुणाच्या घरी त्याच्या लवस्टोरीची चर्चा सुरू झाली. प्रेयसीवर असलेले नितांत प्रेम आणि लग्न करणार तर तिच्याशीच हा निश्चय मनी बाळगून असल्याने त्याने हातावर तिचं नाव गोंदले. दोघांमध्ये सर्व काही ठीक असताना अचानक काहीतरी बिनसलं आणि २०२३ चा अखेरीस तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. प्रियकराचे फोन न घेणे, त्याच्या मेसेजला उत्तर न देणे, त्याच्याशी कुठलाही संपर्क न ठेवणे, मैत्रिणींशी संपर्क केला असता त्यांनाही काही न सांगणे अशा सर्व गोष्टी एका मागोमाग घडू लागल्याने तो बेचैन झाला. ती असं का वागते याचे उत्तर मिळत नसल्याने त्याचे नैराश्य वाढू लागले आणि त्यातूनच त्याने मोठे पाऊल उचलले.
हॉटेलमध्ये असलेली नोकरी सोडून तो व्यसनाकडे वळला. दोन महिने सुरू असलेला नकोसा प्रकार आणि आपल्या प्रेमाला वाचवण्याची धडपड यातून त्याने आठ दिवसापूर्वी घर सोडले आणि थेट जळगाव गाठ. जळगावात तो पोहचला थेट प्रेयसीच्या घरी. परंतु तिथेही त्याच्या पदरी निराशा आली. प्रेयसीने परिवारासह आपले राहते घर सोडून दुसरीकडे वास्तव्याला गेली होती. आठ दिवस जळगाव प्रेयसीचा शोध घेऊन देखील ती मिळून आली नाही सर्वत्र संपर्क केला मात्र त्याच्या पदरी निराशाच आली अखेर मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय पक्का केला. जळगावातील यश लॉन पिंप्राळा रस्त्यावर त्याने रेल्वे रूळ गाठला.
वेळ सायंकाळी ७.३० च्या सुमारासची. रेल्वे रुळाजवळ १५ मिनिटे वाट पाहिल्यावर देखील रेल्वे न आल्याने हताश प्रियकराने पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईन डिव्हाईसवर कॉल केला. ‘मी आत्महत्या करतोय, माझी बॉडी घायला या’ असा संदेश तरुणाने दिला. पोलिसांनी विचारपूस केली मात्र समर्पक उत्तर मिळाले नाही. शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सहाय्यक फौजदार प्रदीप रणीत, पोलीस नाईक चंद्रकांत सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील हे शोध घेण्यास निघाले. जळगाव रेल्वे स्थानकापासून रेल्वे रुळापासून शोध घेत पोलीस पायी निघाले. फोन करणाऱ्या तरुणाशी सतत संपर्क ठेवला. ३ किलोमीटर शोध घेतल्यावर अखेर तो तरुण मिळाला.
पथकाने प्रियकराला शहर पोलीस ठाण्यात आणले आणि पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी विचारपूस सुरू केली. माझ्या जिंदगीत मला जगण्याची इच्छा नाही. माझी बहिण आई वडिलांना सांभाळून घेईल. मला मरू द्या, मला समजून घ्या. मी तिच्याशी एकनिष्ठ आहे. मी स्वतःचा जीव देऊ शकतो पण त्या मुलीवर आच नाही येऊ शकत. माझा पूर्ण परिवार इथे आला तरी मी तिच्याविषयी काही बोलणार नाही. माझ्याशी ती बोलत नाही. माझे काय चुकले हे मला समजत नाही. तुम्ही काहीही करा मी आज जीव देणार आहे असे तो सांगू लागला. बराच वेळ समजावले तरी तरुण काहीही बोलत नव्हता. निरीक्षकांनी त्याला पोलीस ठाण्यात बसवून ठेवत पालकांशी संपर्क साधण्याचे सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी तरुणाचे समुपदेशन सुरू केले. प्रेयसीबद्दल आणि कुटुंबियांबद्दल आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यावर तरुण काहीसा मोकळेपणाने बोलू लागला. मॅडम तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत, मी तुम्हाला सर्व सांगतो म्हणत त्याने बोलायला सुरुवात केली. मोठ्या बहिणीचा संपर्क क्रमांक त्याने दिला. पोलिसांनी अगोदर त्याच्या बहिणीशी बोलणे करून माहिती घेतली आणि त्याच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. हताश तरुणाच्या जेवण पाण्याची सोय पोलिसांनी केली. पहाटे ३ वाजेच्या सुमारास कुटुंबीय पोहचले आणि त्याला जवळ घेतले. तरुणाचे समुपदेशन करून त्याला घेऊन ते रवाना झाले. ‘अजब प्रेम कहाणी’चा असा शेवट झाला. प्रेम कहाणी अजूनही संपली नसून तूर्तास तरी व्हेंटीलेटरवर आहे असेच म्हणावे लागेल. प्रेयसी पुन्हा त्याच्या आयुष्यात आली तर त्याचे आयुष्य बहरेल नाही तर देवच जाणो त्याच्या नशिबी काय?