मनमाडच्या डमरे कॉलनीतील धाडसी घरफोडी प्रकरणाचा छडा

मनमाडच्या डमरे कॉलनीतील धाडसी घरफोडी प्रकरणाचा छडा
स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड पोलिसांचे यश; ३ सराईत गुन्हेगार अटकेत, १ किलोहून अधिक सोन्याचे दागिने हस्तगत
मनमाड (प्रतिनिधी) :
डमरे कॉलनीतील बंद घरात शिताफीने घरफोडी करून तब्बल १.०५ किलो सोन्याचे दागिने व आठ लाख रुपये रोख लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मनमाड पोलिस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून १ कोटी ५ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
घटनेचा तपशील
मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला (चंदा अॅल्युमिनियम, डमरे कॉलनी) हे आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून आणि वाकवून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट फोडून १२०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ८ लाख रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी ११ जून २०२५ रोजी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा (गु. र. नं. ३५९/२०२५) दाखल करण्यात आला होता.
दखल, तपास आणि यश
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड पोलीस ठाण्याच्या पथकांनी तातडीने तपास सुरू केला. श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली. या तपासात आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी, कार्यपद्धती आणि परिसरातील सीसीटीव्ही व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे खालील तिघा सराईत आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात आली.
अटक आरोपी –
१. संजय किशोर गायकवाड (वय ३५) रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड
२. राकेश अशोक संसारे (वय ३०) रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड
३. राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या (वय ३०) रा. नाशिक, मुळ रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश
तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १०५५.८५० ग्रॅम सोन्याचे दागिने (मूल्य ₹१,०५,४०,०००/-) तसेच गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. उर्वरित मुद्देमालाबाबत अधिक तपास सुरू आहे.
तपास पथक
या यशस्वी कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर आणि मनमाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांचे विशेष योगदान आहे. तपास पथक गुन्ह्यातील इतर आरोपी आणि मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास करत आहे.