जळगावातील अनेक बड्यांची एका ‘सीए’ने अडकवली गुंडी!
महा पोलीस न्यूज | ६ जून २०२४ | जळगाव शहराची आर्थिक उलाढाल दिवसेंदिवस वाढतच असून त्यात एकमेकांना टोप्या घालण्याचे प्रकार देखील वाढत आहे. सध्या बड्यांच्या चर्चेत एक चर्चा जोरात रंगली असून एका सीएने अनेकांना बड्या रकमेची टोपी घातल्याचे बोलले जात आहे. बिले देण्याच्या आणि हात ऊसनवारी घेतलेल्या रकमेचा आकडा कोटींच्या घरात असल्याने अनेकांची झोप उडाली आहे.
जळगाव शहरातील काही बड्या उद्योजक, व्यापाऱ्यांचा हवाल्याचा पैसा मुंबईकडे लुटण्यात आल्याची चर्चा चार महिन्यांपूर्वी रंगली होती. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झाल्यानंतर सर्वकाही शांत होते मात्र त्याच काळात एका सनदी लेखापालने अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवल्याचे बोललं जात आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरातील अनेक कट्ट्यांवर त्या एका नामांकित लेखापालची चर्चा सुरु आहे. अनेक बड्या, दिग्गज व्यक्तींना त्याने चकवा दिल्याचे समजते.
सिमेंट बिल देण्याच्या नावाने घेतले पैसे
चर्चेनुसार मार्च महिन्याच्या अखेरीस बिले सादर करावी लागत असल्याने जळगावातील अनेक ठेकेदारांना सिमेंट बील ५ टक्के कमिशन कापून मिळवून देण्याच्या बहाण्याने सनदी लेखापालने पैसे घेतले होते. बिलांची रक्कम थोडीथोडकी नसून कोटीच्या कोटी रक्कम घेण्यात आली असल्याचे समजते. इतकच नव्हे तर अद्याप बिल आणि पैसे देखील परत देण्यात आलेले नाही.
आयपीएल, शेअर मार्केटमध्ये अडकले पैसे
माहितीनुसार सनदी लेखापालावर एप्रिल महिन्यात जीएसटी विभाग नाशिक येथील पथकाने २ दिवस तपासणी केली होती. लेखापाल नामांकित उद्योजकाचा मुलगा आहे. त्याने आयपीएल, शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये चांगलीच वरचढ केली असल्याचे समजते. अनेक ठेकेदार, नामांकित व्यापारी, उद्योजक यांच्या शब्दात अडकल्याचे समजते.
८ दिवसापासून नॉट रिचेबल
सनदी लेखापालने सिमेंट बिलांच्या नावे घेतलेली रक्कम ७ कोटी, नामांकित मंडळीकडून हात उसनवार ९ कोटी, ग्रामीण भागातील मंडळीकडून ५ कोटी हात उसनवार घेतल्याचे समजते. त्यात बाजार समितीतील काही आजी – माजी संचालकांकडून देखील हात उसनवारी मोठी रक्कम घेतल्याचे समजते. मुंबईत लेखापालचे वेगळे घर असून गेल्या ८ दिवसापासून तो शहरात नसल्याचे देखील समजते. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास अद्याप कुणी पुढे आलेले नसले तरी चर्चा जोर धरत आहे.