PoliticsSocial

जळगाव जिल्ह्याचा केंद्रीय पशुधन नोंदणी योजनेत समावेश करा!

जळगाव जिल्ह्याचा केंद्रीय पशुधन नोंदणी योजनेत समावेश करा!

खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन; दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा अनुदानाचा लाभ मिळवून देण्याची मागणी

जळगाव, प्रतिनिधी : दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि भारतीय जातीच्या गायी व म्हशींच्या संगोपनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्रीय पशुधन नोंदणी योजना (सी.एच.आर.एस.) जळगाव जिल्ह्यात सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात खासदार स्मिताताई उदय वाघ यांना निवेदन देऊन केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.

सध्या ही योजना महाराष्ट्रात केवळ नाशिक जिल्ह्यात सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत भारतीय जातीच्या गायी आणि म्हशींचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति जनावर दरमहा अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि दुग्धव्यवसायाचे महत्त्व लक्षात घेता या जिल्ह्याचाही योजनेत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची विनंती

खासदार स्मिताताई वाघ यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांच्याकडे या मागणीसाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. जळगाव जिल्ह्याचा योजनेत समावेश झाल्यास जिल्ह्यातील पशुपालक आणि दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

खर्च वाढल्याने दुग्धव्यवसाय आर्थिक संकटात

सध्या जनावरांचे खाद्य, चारा आणि संगोपनाचा वाढता खर्च यामुळे दुग्धव्यवसाय करणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक बनले आहे. सर्व खर्चाचा हिशोब केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अशा वेळी शासकीय अनुदानाचा आधार मिळाल्यास पशुपालकांचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होऊ शकते.

जळगाव जिल्ह्यातील पशुधनाची संख्या आणि दुग्धव्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन केंद्रीय पशुधन नोंदणी योजनेत जिल्ह्याचा समावेश करावा. यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button