FarmingPolitics

रावेर-यावल कृषी कार्यालयातील ५६ रिक्त पदे तातडीने भरा आमदार अमोल जावळे यांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी; पीक विम्याच्या प्रश्नावरही चर्चा

रावेर-यावल कृषी कार्यालयातील ५६ रिक्त पदे तातडीने भरा आमदार अमोल जावळे यांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी; पीक विम्याच्या प्रश्नावरही चर्चा

रावेर : रावेर व यावल तालुका कृषी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, मार्गदर्शन आणि शासकीय सेवांचा लाभ मिळविताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. दोन्ही तालुक्यांतील कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी त्यांनी केली.

यावल तालुका कृषी कार्यालयात मंजूर असलेल्या ६७ पदांपैकी ३८ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून २९ पदे रिक्त आहेत. तर रावेर तालुका कृषी कार्यालयात मंजूर ६७ पदांपैकी ४० पदे कार्यरत असून २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रावेर व यावल या दोन्ही कार्यालयांमध्ये एकूण ५६ पदे रिक्त आहेत.

यामध्ये कृषी सहाय्यकांची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यावल तालुक्यात कृषी सहाय्यकांची १५, तर रावेर तालुक्यातही १५ पदे रिक्त असून, दोन्ही तालुक्यांत कृषी सहाय्यकांची एकूण ३० पदे रिक्त आहेत.

कृषी विभागातील मनुष्यबळाची कमतरता असल्याने शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजना, कृषीविषयक मार्गदर्शन आणि सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच विभागाच्या दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे रिक्त पदे नियमानुसार पदभरती प्रक्रियेद्वारे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी कृषिमंत्र्यांकडे केली.

पीक विम्याच्या प्रश्नावरही चर्चा

दरम्यान, रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नावरही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पीक विम्याचा लाभ मिळविताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच संबंधित प्रलंबित प्रश्नांकडे आमदार जावळे यांनी कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले.

यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button