Politics

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

महापौर स्वच्छता संकल्प अभियान : प्रभाग ४ मध्ये झाडाझडती

जळगाव (प्रतिनिधी):महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत सोमवारी (दि. १९) प्रभाग क्रमांक ४ मध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. महापौर दीपमाला काळे यांनी प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अनाधिकृत अतिक्रमणांची कसून पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक गंभीर बाबी उजेडात आल्या असून, महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत तातडीने कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

*पाणी वाया जाणाऱ्या प्रकारांवर संताप*
पाहणीदरम्यान पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला. बालाजी मंदिरासमोर एका बंद घराचे नळ कनेक्शन बेवारस स्थितीत आणि पाणी वाया जात असल्याचे दिसून आले.गंगा कावेरी निवास या घरात नळांना तोट्या लावलेल्या नसल्याने पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे निदर्शनास आले. या घरांपुढेही अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे पाहताच महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने जाब विचारला.

*गटारी साफसफाई व उघड्या गटारी बंदिस्त करण्याचे निर्देश*
प्रभागातील परिसराची पाहणी करताना परिसरातील साचलेल्या कचऱ्यामुळे दुषित झालेल्या व तुटलेल्या गटारींची गंभीर दखल घेण्यात आली. परिसरातील गटारी तात्काळ साफ करण्याचे आदेश देण्यात आले. या कामासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले असून, शहरातील सर्व उघड्या गटारी स्वच्छ करण्याचे व तातडीने साफ करण्याचे निर्देश बांधकाम व आरोग्य विभागाला दिले. तसेच, पुलाजवळील शौचालयाजवळ उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर तातडीने प्रतिबंध घालून संबंधितांवर दंड आकारण्याचे आदेशही महापौर दीपमाला काळे यांनी दिले. याप्रकरणी स्वच्छता निरीक्षक डाबोरे यांनी प्रभागात एक ट्रॅक्टर व कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली.

*शनिपेठ आणि कुंभार गल्लीत अनाधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई*

शनिपेठ भागातील सोनवणे विद्यालयासमोर आणि शनिपेठ भागात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत अतिक्रमण असल्याचे पाहणीत आढळले. घरांसमोर चिकन विक्रेत्यांनी अनाधिकृत शेड उभारून कोंबड्या ठेवल्याचे निदर्शनास आले. काही मडके विक्रेत्यांनी आपले साहित्य अर्ध्या रस्त्यापर्यंत विक्रीसाठी मांडल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती आणि पायी चालणेही मुश्किल झाले होते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी विक्रेत्यांचे परवाने तात्काळ तपासून सर्व अनाधिकृत अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले. तसेच कुंभार गल्लीच्या चौकात विनावापर धुळ खात पडून असलेली पान टपरी तात्काळ उचलून हटवण्याचे निर्देशही यावेळी दिले गेले.

या पाहणी दौऱ्यात प्रभागातील प्रश्न व समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक विद्या सोनवणे, कल्पेश सोनवणे, शशीबाई ढंडोरे यांच्यासह अभियंता जितेंद्र रंधे, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले तसेच पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रभागातील यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button