चोरीच्या घटनांनी मुक्ताईनगर तालुक्यात शेतकरी धास्तावले; २० शेळ्या आणि ठिंबक नळ्यांची चोरी

महा पोलीस न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुकळी गावातून एकाच रात्री 20 शेळ्या आणि शेतातून ठिंबक नळ्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून, पोलिसांनी चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
सुकळी येथील संजय भागवत पाटील यांच्या बंदिस्त गोठ्यातून सुमारे 20 शेळ्या चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पळवून नेल्या. त्याच रात्री, संदीप रामकृष्णा चौधरी यांच्या शेतातील नवीन केळी लागवडीसाठी ठेवलेल्या ठिंबक नळ्याही चोरट्यांनी लंपास केल्या. या दोन्ही घटनांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात माळेगाव शिवारातून 30 मेंढ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. यापूर्वीही सुकळी गावातून नामदेव इंगळे, धनलाल राठोड, गणेश इंगळे आणि सरदार राठोड यांच्यासारख्या अनेक पशुपालकांचे पशुधन चोरीला गेले आहे. मात्र, यापैकी कोणत्याही गुन्ह्याचा अद्याप तपास लागलेला नाही.
या वाढत्या घटनांमुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.
संजय पाटील यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. शेतकरी आणि पशुपालकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.