शालकाच्या ५३ लाखांच्या विम्यासाठी अपघाताचा बनाव; पोलिसांच्या तपासाने उघड झाला खुनाचा कट

शालकाच्या ५३ लाखांच्या विम्यासाठी अपघाताचा बनाव; पोलिसांच्या तपासाने उघड झाला खुनाचा कट
पारोळा पारोळा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका कापूस व्यापाऱ्याने सख्या शालकाच्या नावावर ५३ लाख रुपयांच्या विमा पॉलिसी घेतल्या आणि त्या रकमेवर डोळा ठेवत त्याचा खून करून अपघाताचा बनाव केला. पोलिसांच्या दमदार तपासामुळे केवळ दहा दिवसांत हा कट उघडकीस आणत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,शेवगे येथील रहिवासी संदीप भालचंद्र पाटील याने आपल्या शालक समाधान शिवाजी पाटील (रा. फागणे, जि. धुळे) यांच्या नावे एलआयसीच्या तीन व खासगी कंपन्यांच्या दोन, अशा एकूण पाच विमा पॉलिसी घेतल्या होत्या. या पॉलिसींची एकूण किंमत ५३ लाख रुपये होती. समाधान पाटील अपंग आणि व्यसनाधीन असल्याचा गैरफायदा घेत संदीप पाटीलने त्याच्या पत्नीस वारसदार ठरवून हा कट रचला.
१७ एप्रिलच्या रात्री संदीप आणि त्याचा आतेभाऊ चंद्रदीप आधार पाटील (रा. खवशी, ता. अमळनेर) यांनी समाधान पाटीलला स्कुटीवरून घेऊन धुळे-पारोळा महामार्गावर नेले. तेथे अंधाराचा फायदा घेत लोखंडी रॉडने डोक्यावर घाव घालून त्याचा निर्घृण खून केला आणि नंतर अपघाताचा आभास निर्माण केला.
१७ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता संदीप पाटीलने पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना मृताच्या डोक्यातून आलेले रक्त काही अंतरावर पडलेले दिसले आणि शंका बळावली. पोलिस निरीक्षक सुनील पवार व उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी सुरू झाली.
चौकशीत संदीपने उलटसुलट उत्तरे दिली. त्याचा मोबाईल सीडीआर तपासला असता, घटनास्थळावर त्याचे उपस्थितीचे पुरावे मिळाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासूनही महत्त्वाचे धागेदोरे सापडले. अखेर पुरावे हाती येताच पोलिसांनी संदीप व चंद्रदीप यांना अटक केली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
वाहन सुस्थितीत आढळल्याने संशय गडद
अपघातस्थळी स्कुटी पूर्णपणे सुस्थितीत आढळून आली होती, ज्यामुळे अपघाताचा बनाव असल्याचा पोलिसांचा संशय अधिक दृढ झाला. डीवायएसपी विनायक कोते व पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याचा पर्दाफाश केल्याची माहिती दिली.