राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी
मुंबईत नियुक्तीपत्र प्रदान; संघटना बळकटीसाठी कार्य करण्याचा निर्धार
जळगाव | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक एस. लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुनील भुसारा आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार उपस्थित होते.
दुसऱ्यांदा मिळाली जबाबदारी
अशोक लाडवंजारी यांनी यापूर्वीही महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले असून त्यांच्यावर दुसऱ्यांदा ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वी त्यांनी भाजपच्या जळगाव महानगराध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली होती.
सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय योगदान
लाडवंजारी यांनी जळगाव महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा नियोजन समिती सदस्य, महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य तसेच शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून काम केले आहे. सध्या ते नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सचिव आहेत. नाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून वस्त्रवाटप, ब्लँकेट वाटप, अन्नदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच गरजू महिलांना साड्यांचे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत.
पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याचा विश्वास
नियुक्तीनंतर जळगाव शहरात पक्षसंघटना अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार लाडवंजारी यांनी व्यक्त केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा प्रसार घराघरात आणि प्रत्येक प्रभागापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा
या नियुक्तीबद्दल आमदार एकनाथ खडसे, रोहिणी खडसे-खेवलकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, प्रमोद पाटील, संतोष चौधरी, डॉ. बी. एस. पाटील, भास्कर काळे, ईजाज मलिक, दिलीप खोडपे, वाय. एस. महाजन, कल्पिता पाटील, मंगला पाटील, मजहर पठाण, विकास पवार, राजू मोरे, सुनील माळी, किरण राजपूत, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, विनायक पाटील, रिंकू चौधरी, सुरेश पगारे, गौरव वाणी यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






