
महा पोलीस न्यूज । मिलींद वाणी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एका अत्यंत गंभीर प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना अमानुष मारहाण करून त्यांना एकमेकांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
तक्रारीनूसार, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात, पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांनी तीन संशयित तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावले. आरोपानुसार, नार्हेडा यांनी एका समाजाच्या या तिन्ही तरुणांना अंगावरील कपडे काढायला लावून, पट्ट्याने अमानुष मारहाण केली. एवढेच नव्हे तर, त्यांना नग्न करून एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडले, असा अत्यंत किळसवाणा आरोप त्यांच्यावर आहे. याच प्रकरणात एका महिलेलाही अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार तिने केली आहे.
निलंबन आणि विभागीय चौकशी सुरू
या गंभीर घटनेनंतर पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी आणि एकलव्य संघटनेने पोलीस अधीक्षक यांच्याकडे तातडीने तक्रार दाखल केली. या तक्रारींची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. सध्या त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
..तर कायदेशीर कारवाई होणार
बहुजन समाज पार्टी, जळगाव जिल्हा महासंघाचे पदाधिकारी सचिन बाविस्कर यांनी सांगितले की, पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी आणि भिल्ल समाज संघटनेने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत दोषी आढळल्यास नार्हेडा यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






