रामदेववाडी अपघात : तथ्य, आरोप आणि प्रथमदर्शनी दिसणारी घटना
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव शहराकडून पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बंजारा समाजाची वस्ती असलेले एक गाव ‘रामदेववाडी’ बाबा रामदेव यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले गाव १७ दिवसापासून शोकसागरात बुडाले आहे. चव्हाण कुटुंबातील चौघांना बड्या बापाच्या पोरांमुळे जगाचा निरोप घ्यावा लागला. घटना घडल्यानंतर पोलिसांवर आरोप झाले, गावाने मतदानावर बहिष्कार टाकला, नेत्यांनी भेटी घेतल्या पण कुटुंबाला न्याय मिळाला का? अखेर १७ दिवसांनी तपास अधिकारी बदलला, संशयितांना ताब्यात घेण्यात आले मात्र हे सर्व पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर घडले. अपघाताची कारणमिमांसा करताना काही गोष्टी जाणून घेणे फार आवश्यक आहे.
अशी होती घटना..
शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण वय – २६ या आशासेविका असून रामदेववाडी गावात त्यांचे माहेर आहे. परिसरातील गावात त्या सेवा बजावत होत्या. दि.७ मे मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्या मुलगा सोहम वय – ७, सोहमेश वय – ४ आणि १६ वर्षीय भाचा लक्ष्मण नाईक असे चौघे इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक एमएच.१९.ईई.८९२५ ने शिरसोलीकडे जात होते. रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर जळगावकडून येत असलेल्या भरधाव कार क्रमांक एमएच.१९.सीव्ही.६७६७ ने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकी चक्काचूर झाली तर चारचाकी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेचा कंपाऊंड तोडून आत शिरली. अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाले.
चारचाकीतील तरुणांना मारहाण झाली?
रामदेववाडी गाव अपघात स्थळापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर आहे. गावातील मुलीचा आणि चिमुकल्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर सारा गाव तिथे पोहचला. बहुतांश नागरिक मयतांचे नातेवाईक होते. मिळालेल्या माहितीनुसार अगोदर धडक देणाऱ्या कारमधील अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार यांना जमावाने बाहेर बसवून ठेवले. अपघातात कुण्या अनोळखीचा मृत्यू झाला तरी जमाव संतापतो इथं तर कुटुंबातील चौघे गेले होते साहजिकच संताप होणारच. जमावातील काहींनी दोघांना बेदम बदडले. अर्नवला खूप मार बसला.
परिस्थिती का चिघळली?
घटनेनंतर चिमुकल्याचे मृतदेह पाहून जमाव आक्रमक होत होता, त्यातच कुणी एक पोलीस पाटील आपले काही कार्यकर्ते घेऊन तिथं पोहचला. तरुणांची बाजू घेत त्यांनी मयताच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच वातावरण बिघडलं. जमावावर दगडफेक होताच एक कार क्रमांक एमएच.१९.सीजे.११७७ ही तरुणांना घेऊन जाण्यासाठी पोहचली. जमावाने दोन्ही वाहनाची तोडफोड केली. तेवढ्यात आणखी एक कारने काही तरुण आणि आरसीपी पोलीस पथक पोहचले व त्यांनी तरुणांना ताब्यात घेत जमावाच्या तावडीतून सोडवत शासकीय वाहनाने शहराकडे रवाना केले. मृतदेह पडून असताना धडक देणाऱ्यांचा बचाव केल्याने जमावाचा रोष पोलिसांच्या दिशेने वळला.
घटनेनंतर पोलीस होते कुठे?
घटना घडली त्या दिवशी जळगावात माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांची जळगावात सभा असल्याने बहुतांश पोलीस अधिकारी, कर्मचारी तिकडे होते. पोलीस अधीक्षक बैठकीसाठी धुळे, अपर पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी, कर्मचारी निवडणूक बंदोबस्तकामी सोलापूर येथे गेले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी पाचोरा गेले होते. घटनेची माहिती मिळताच काही अधिकारी आणि कर्मचारी तिथे पोहचले. घटनास्थळी जमलेला जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने कुणीही हस्तक्षेप केला नाही. नातेवाईक सांगतील त्या पद्धतीने पंचनामा करण्यात आला. पोलीस बघ्याची भुमिका घेण्यापलीकडे काही करू शकत नव्हते.
पोलीस चुकले का?
होय, पोलीस चुकलेच असे आपण म्हणू शकतो पण संशयित आरोपीची सुरक्षा करणे हे पण पोलिसांचे कर्तव्य आहे. नुकतेच भरती झालेल्या पोलिसांनी तेच केले. परंतु मयतांच्या नातेवाईकांची बाजू समजून घेत लागलीच गुन्ह्यात एनडीपीएस कायद्यानुसार वाहनात गांजा मिळून आल्याचे कलम लावणे पोलिसांचे काम होते, ते त्याच दिवशी न झाल्याने ग्रामस्थांचा रोष ओढवला. वाहन चालविणारा कोण हे शोधण्यास पोलिसांना १६ दिवस लागले. धडक देणाऱ्या वाहनातील तरुण अर्णव कौल हा मंत्री अनिल पाटील यांचे निकटवर्तीय अभिषेक कौल यांचा मुलगा तर अखिलेश पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा असल्याने त्यांचा बचाव केला जात असल्याचा समज वाढला. काही मुद्दे आणि पोलिसांकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने देखील गैरसमज वाढले. तरुणांना मारहाण कुणी केली आणि पब्लिकमारमध्ये गंभीर दुखापत करणारे कोण हे अनुत्तरीतच आहे. वाहनात नेमके किती तरूण आणि कोण होते हे देखील अद्याप स्पष्ट नाही. आरोपींची वैद्यकीय तपासणी केलीच नाही असा आरोप होत असला तरी त्यात तथ्य नाही. अर्णवला मुंबई घेऊन जात असल्याने त्याची पारोळा येथे तर अखिलेशची जळगाव जिल्हा वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय तपासणी करण्यात आली होती.
पोलीस तपास काय सांगतो?
चव्हाण कुटुंबीयांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अर्णव कौल आणि अखिलेश पवार यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कायदा आणि वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याशिवाय दोघे तंदरूस्त असल्याशिवाय त्यांना अटक शक्य नव्हती. पोलिसांनी संबंधित रुग्णालयाला याबाबत कळविले होते. वाहनात गांजाच्या पुड्या मिळून आल्या मात्र तो गांजाच आहे याचा अहवाल अद्याप प्राप्त नाही. दोघांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल अद्याप प्राप्त नाही. अपघात बेदकारपणे वाहन चालविणे, घाट व वळण रस्ता असताना देखील जोरात कार चालविल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. इतर दोघांच्या बाबतीत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. कार चालक अर्णव कौल हा होता. पुणे अपघातनंतर जळगावची घटना देखील पुन्हा समोर आली आणि सर्व सूत्रे वेगाने हलली.
पुणे आणि रामदेववाडी अपघात एक सारखाच?
पुणे येथे कल्याणी नगर भागात अग्रवाल बिल्डरच्या बेट्याने दोन अभियंत्यांना उडविले. देशभर यावरुन चर्चा सुरुय मात्र जळगावच्या विषयावर कुणी बोलत नाही. पुणे येथील घटनेत चालक अल्पवयीन होता, वाहन चालविण्याचा परवाना त्याच्याजवळ नव्हता, महागड्या पोर्शे कारची नोंदणीच झालेली नव्हती, अपघातानंतर संशयित तरुण पळून गेल्याने गुन्हा हिट अँड रन प्रकारात मोडतो, बड्या बापचा बेटा मद्यप्राशन करीत असल्याचे फुटेज आणि ४८ हजारांचे बील भरल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, पोलिसांनी सुरुवातीला ३०४ अ कलम लावल्याने जामीन लवकर मिळाला अशा काही बाबी आहेत. रामदेववाडी प्रकरणात दोन्ही तरुण अल्पवयीन नाही, ते पळून गेले नाही तर पोलिसांनी त्यांना आणले त्यामुळे हिट अँड रन होत नाही, दोघांनी मद्य किंवा गांजा अथवा काही अंमली पदार्थांचे सेवन केले हे अद्याप स्पष्ट नाही, वाहनाने वळण रस्त्यावर धडक दिली असल्याने वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात झाला असे होते, दोघे जखमी असल्याने उपचार सुरु आहेत.
काय होऊ शकते?
कायदेशीर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कायद्याच्या चौकटीत सर्व एकसमान आहेत. आजची अर्णव कौल याची शारीरिक परिस्थिती लक्षात घेता त्याला अटक करुन न्यायालयात सादर केले जाईल की नाही हा मोठा प्रश्न आहे. बहुदा पोलिसांच्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न न्यायालयात देखील जनमाणसात उपस्थित होऊ शकतात. इतर दोन संशयीत, गांजा, अपघाताची कारणे यासाठी एकाला तरी पोलीस कोठडीची मागणी पोलीस करतील. पुणे प्रमाणे जळगावात होणे शक्य नसले तरी कायद्याच्या तावडीतून सुटणे देखील शक्य नाही हे तेवढेच शक्य आहे. अर्णवचे सर्व वैद्यकीय अहवाल आणि बाजू तपासल्यावरच पोलीस पुढील तपासाची दिशा ठरवतील.
गरीब कुटुंबाला न्याय कधी मिळणार?
बड्या बापाच्या मुलांमुळे चव्हाण कुटुंबातील चौघे आज जगात नाही. संपूर्ण ग्रामस्थ आणि समाज न्याय मिळण्याची आशा लावून आहे. गावात मोर्चा काढला, निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यावर केवळ लहानसे गतिरोधक टाकण्यात आले. न्याय आजही प्रतिक्षेत आहे. जिल्ह्यातील नेते तर मदतीला आले नाही मात्र न्यायदेवतेवर सर्वांना विश्वास आहे. उशिरा का असेना पण गरिबांची बाजू घेतली जाईल. पोलीस टीकेचा सॉफ्ट कॉर्नर नेहमीच राहिले असून राजकारणी मात्र बोलूनच्या बोलून बिनधास्त आहेत. चव्हाण कुटुंबाच्या साथीला कुणी बडा नेता असो वा नसो मिडिया उभा आहे.