मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती
महा पोलीस न्यूज । मुंबई/जळगाव । राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. सरकार स्थापनेच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रालयातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागात अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करीत असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ.रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. मंगेश चिवटे यांच्या जागी डॉ.रामेश्वर नाईक यांची नियुक्ती या विभागाच्या प्रमुख पदावर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे.
रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.
कोण आहेत रामेश्वर नाईक ?
डॉ.रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०१४ साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते. यानंतरच्या काळात त्यांनी काही धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम पाहिले. जुलै २०२१ मध्ये रामेश्वर नाईक वैद्यकीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.
राज्यात राबवली ११५ पेक्षा अधिक मोफत वैद्यकीय शिबिरे
रामेश्वर नाईक यांनी विविध पदांवर काम करताना राज्यात अनेक ठिकाणी तब्बल ११५ वैद्यकीय शिबिरे घेतली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर, लेप्रोसी, डायबेटिसच्या हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय, कुपोषण निर्मुलन, अवयवदानासाठीही रामेश्वर नाईक यांच्या माध्यमातून शिबिरं घेण्यात आली. याशिवाय, ८९ मोतीबिंदू उपचार शिबिरे आणि २२ रक्तदान शिबिरांचे आयोजनही डॉ.नाईक यांनी केले होते. रामेश्वर नाईक हे भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे विश्वासू समजले जातात.
गिरीश महाजन यांच्याकडून अभिनंदन
दम्यान, रामेश्वर नाईक यांची नियुक्ती झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, माझ्या आजवरच्या आरोग्यसेवेतील महत्त्वाचा दुवा, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे राज्यस्तरीय विशेष कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील तमाम गरजू नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी आधार मिळावा, अशा शुभेच्छा देखील गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत.