सामाजिक अनैतिकतेचे बालेकिल्ले उध्वस्त करणारा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर – विनोद अहिरे

सामाजिक अनैतिकतेचे बालेकिल्ले उध्वस्त करणारा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर – विनोद अहिरे
जळगाव १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, संपूर्ण जगामध्ये धुमधडाक्यात साजरी होत असते. आंबेडकरी समाजाच्या नसानसामध्ये चैतन्याची लहर उठत असते. आंबेडकरी समाज म्हणजे नुसताच बौद्ध समाज नव्हे, तर जो आंबेडकरी विचारधारा जोपासतो, देशासाठी, समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असतो, राष्ट्रीय ग्रंथ संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत राहून सनदशीर मार्गाने कार्य करतो, अशी सर्व लोक आंबेडकरी समाजामध्ये मोडतात. अशा सर्व व्यक्तींसाठी १४ एप्रिल हा सर्वात मोठा उत्सव असतो. तो उत्सव प्रत्येक आंबेडकरी व्यक्तीने साजरा केलाच पाहिजे. या बद्दल दुमत असूच शकत नाही. पण नुसती बाबासाहेबांची जयंती उत्सव साजरा करून चालणार आहे का? तर नाही. डॉ. “बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचून त्यांचे भक्त होण्यापेक्षा,” “त्यांना डोक्यात घेऊन त्यांचे अनुयायी होऊन त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे.” जेव्हा या देशामध्ये बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून आचरण करतील, तेव्हा येथील प्रत्येक माणसाची, समाजाची प्रगती तर होईलच पण त्याचबरोबर हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. तेच खरं डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन, खरी मानवंदना असेल. अस्पृश्यतेच्या अग्निकुंडामध्ये होरपळत असलेल्या समाजाला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा नवसंजीवनी मंत्र देऊन, बाबासाहेबांनी नवजीवन दिले. समाज शिकला, त्याने संघर्षही केला. पण त्या संघर्षाच्या तलवारीला संघटनेच्या एकतेची धार नसल्यामुळे वैचारिक/ राजकीय रणांगणावर त्याच्या पदरात फक्त अपयशाशिवाय दुसरं काहीच पडलं नाही. कारण बोथड झालेल्या तलवारीने युद्ध कधीच जिंकता येत नसतं. वैचारिक/राजकीय लढाई जर आपल्याला जिंकायची असेल तर आंबेडकरी समाजाने संघटित होऊन आपल्या सामर्थ्याच्या तलवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची धार देऊनच रणांगणात उतरले पाहिजे. येथील प्रत्येक माणसाला पटवून दिले पाहिजे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसतेच दलितांचे पुढारी नव्हते तर येथील समस्त बहुजनांच्या उन्नतीचा एक राजमार्ग होता. या देशाला महासत्तेच्या सिंहासनावर विराजमान करणारा एक विचार आहे. आजही बहुतांशी लोकांना एवढेच ज्ञात आहे की, डॉ. बाबासाहेब दलितांचे कैवारी होते, संविधान निर्माते आहेत, पण डॉ. बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार, राजकीय विचार, सामाजिक विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अर्थ नीती, जलनीती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परराष्ट्र धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून जन्माला आलेली भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाची झालेली स्थापना, समस्त महिलांच्या कल्याणासाठी हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून मंत्रीपदाचा केलेला त्याग, जेव्हा आपण समस्त बहुजनांपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य निदर्शनास आणून देऊ, तेव्हा खऱ्या अर्थाने इथल्या समस्त बहुजन वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळतील. त्यांचे विचार कळतील. तेव्हाच कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार मार्गावर संपूर्ण बहुजन समाज चालेल आणि हा देश महासत्ता होईल.
*डॉ. बाबासाहेबांचे राजकीय विचार* स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही,मूलभूत हक्क, अल्पसंख्यांकांचे हितरक्षण इत्यादी संबंधीचे विचार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नांसंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञानासंबंधीचे मते आपल्या अनेक लेखनातून, भाषणातून मांडली आहेत, तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत. आंबेडकर यांचे राजकीय विचार घटना परिषदेच्या अधिवेशनात केलेल्या भाषणात देखील त्यांनी व्यक्त केलेले आहेत. आजही देशाच्या राज्यकारभारावर त्याचा प्रभाव जाणवतो.
*समाजवादासंबंधी विचार*:- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादाचा पुरस्कार केला होता, परंतु त्यांना रशिया, चीन व इतर साम्यवादी देशातील एक पक्ष पद्धतीचा समाजवाद मान्य नव्हता, देशातील समाजवादी व्यवस्था राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रात लोकशाहीचा स्वीकार करून आणि उद्योगधंद्यावर सरकारची मालकी प्रस्थापित करून समाजवादी व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते असे त्यांना वाटत होते.
*अर्थनीती* डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे निष्णात अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखले जातात, त्यांचा मुख्य विषय अर्थशास्त्र हाच होता. या विषयावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून ‘भारतीय रिझर्व बँकेचा’ जन्म झालेला आहे. देशाच्या इतिहासातील पहिले सर्वात सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्याचबरोबर आंबेडकर समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षण तज्ञ, पत्रकार, उत्कृष्ट संसदपटू होतेच परंतु या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक समाज सुधारक, मानवी अधिकारांचा रक्षक, थोर विचारवंत या नात्याने केलेले त्यांचे कार्य अतुलनीय आहे.
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार*:- शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने समाजाला आपले कर्तव्य व आपल्या हक्काची जाणीव होते. अस्पृश्य समाजाला स्वाभिमानाची जाणीव व्हावी म्हणून यासाठी शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना नेहमीच सांगत. समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे, शिक्षण प्राप्त झाल्यावर व्यक्ती बौद्धिक दृष्टया सशक्त होतो, प्रज्ञा, शील, करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे,असे त्यांना वाटायचे.
देशाच्या उन्नतीचे असे एकही कार्य नाही की, ते डॉ. बाबासाहेबांच्या हातून घडले नाही. ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्राच्या विकासासाठी येथील दुर्बल घटकांसाठी लढत राहिले आणि ६ डिसेंबर १९५६ साली या माहासूर्याने अखेरचा श्वास घेतला. ते शरीराने आपल्यातून निघून गेलेत पण त्यांनी जाता जाता या देशातील सामाजिक अनैतिकतेचे बालेकिल्ले उध्वस्त करून गेले
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी येथील अखिल भारतीय समाजासाठी या देशाच्या प्रगतीसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणे हेच इथल्या मानव जातीचं अंतिम ध्येय असले पाहिजे…
त्या महा सूर्याच्या प्रकाश किरणांना आम्ही जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन करतो.
पो.ना. विनोद पितांबर अहिरे पोलीस मुख्यालय जळगाव
लेखक महाराष्ट्र पोलीस दलातील साहित्यिक/कवी आहेत .
९८२३१३६३९९